-->
‘कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


  • सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार
    ● इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घेण्याचे आवाहन


  


मुंबई :-  इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’ विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.


बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article