-->
लॉकडाउनच्या काळात बारामती आगाराचे जवळपास 15 कोटींचे नुकसान

लॉकडाउनच्या काळात बारामती आगाराचे जवळपास 15 कोटींचे नुकसान

बारामती (पुणे) : लॉकडाउनच्या काळात बारामती आगाराचे जवळपास 15 कोटींचे नुकसान झाले आहे. 22 मार्चपासून ते 22 मेपर्यंत दोन महिने पूर्णपणे एसटीचे कामकाजच बंद आहे. त्यामुळे बारामती शहर व बारामती एमआयडीसी या दोन्ही आगारांचे मिळून हे नुकसान झाले आहे.


बारामती आगाराला महिन्याला साधारण साडेतीन कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. त्यात दीड कोटी रुपये सवलतींपोटीचे असतात. एका महिन्यात साधारणपणे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न एसटी मिळवते. दोन्ही आगारांचे मिळून राज्य मार्ग परिवहन मंडळाचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी व्यक्त केला.


बारामतीतून दररोज साधारणपणे सातशे फेऱ्या होतात. वाहक व चालकांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. दोन्ही आगारात मिळून 150 बस गाड्या आहेत. बारामती शहर व तालुक्‍याला रस्ते मार्गाने जोडणारे एसटी हे सर्वांत स्वस्त व सुरक्षित असे साधन आजही ग्रामीण भागात मानले जाते. बारामती- पुणे- बारामती विनावाहक विनाथांबा ही सर्वाधिक उत्पन्न देणारी सेवा आहे. मात्र, पुण्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असल्याने पुण्याची बससेवा पूर्ववत केव्हा सुरू होणार, हे कोणालाही सांगता येत नाहीये.


रिक्षाचालकही अडचणीत
बारामतीची बससेवा सुरू झाली असली; तरी नीरा व फलटण मार्ग वगळता उर्वरित मार्गांवर शटल सेवा कालपासून सुरू करण्यात आली. एका बसमध्ये 20 प्रवाशांना घेऊन सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जोपर्यंत एसटीची सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत शहरातील तीन आसनी रिक्षाचालकांचाही व्यवसाय सुरळीत होत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे लवकर राज्यातील एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी होऊ लागली आहे.


"शिवशाही'बाबत चिंता
लॉकडाउननंतर सेवा सुरू झाली, तरी "शिवशाही'सारख्या वातानुकूलित गाडीतून प्रवास करण्यास प्रवासी कितपत तयार होतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. वातानुकूलन व प्रवासाचे अधिकचे दर या मुळे या गाड्यांना किती भारमान मिळेल, याबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article