शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास; पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित
हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडहून पंढरीच्या विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राज्याभिषेक शक ३४७, यावर्षी ९ जून २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी स्थानाहून होणार आहे.
वाडेश्वर-जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन राजसदर-होळीचा माळ, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्दमधील मारुती मंदिरात येईल.
दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामास ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या ऐतिहासिक पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात हा सोहळा येईल. तेथून मजलदरमजल करत ज्येष्ठ शुद्ध दशमी, १५ जूनला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यात दाखल होईल.
भागवत धर्माचे संस्थापक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माऊलींच्या वारीचे जनक तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भेटीचा उत्सव हडपसरला १६ जूनला होईल. मग पालखी सोलापूर महामार्गाने दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी, गादेगाव मार्गे आषाढ शुद्ध दशमी, ३० जूनला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. आषाढी वारीचा सोहळा आटोपून गुरुपौर्णिमेसच राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पालखीचा परतीचा प्रवास वाहनाने होऊन तीन मुक्कामात ४ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल़
- पालखी मार्गावरील ५३ शाळांमध्ये होणारे भक्ती-शक्ती जागरण रिंगण सोहळे यावर्षी होणार नाहीत.
- सामाजिक आरोग्य अंतर कायम राखून जास्तीत जास्त पाचच शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास करतील.
- पालखी, दिखाव्याचा डामडोल, सोहळ्यातील व्यवस्थेची वाहने आदी सारे टाळले जाणार आहे.
- सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे उपचार यावर्षी होणार नाहीत.
- रायगड ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवरायांच्या पादुकांना डोक्यावरच घेऊन होणार आहे.
- पादुकांचे दर्शन त्या त्या गावातील शिवभक्तांना सामाजिक प्रचार-प्रसार माध्यमातून केले जाणार आहे.