बारामतीत कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु
बारामती : कोरोनावर मात करण्यासाठी तालुक्यासाठीचे कोविड हेल्थ सेंटर आजपासून कार्यान्वित झाले. कोरोनाची तपासणी व उपचार दोन्हीही बारामतीत व्हावेत, त्यासाठी पुण्याला जावे लागू नये, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा केला होता. अवघ्या पंधरवड्यात सर्व बाबींची पूर्तता करुन बारामती एमआयडीसीतील रुई ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर पूर्ण वेळ कोविड हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
बारामती शहर व तालुक्यातील ज्यांना आपल्याला कोरोनासदृश त्रास होत आहे त्यांनी आता या पुढील काळात फक्त रुई ग्रामीण रुग्णालयातच जायचे आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागात सहा बेडची व्यवस्था असून, आयसोलेशनसाठी 16 तर कोरोना संशयितांसाठी आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यातही स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
►
हे सेंटर अद्ययावत व्हावे यासाठी येथे सेंट्रलाईज्ड ऑक्सिजन पाईपलाईनही सज्ज झाली आहे. कोरोना रुग्णांबाबत व्यवस्थित माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने एका कंट्रोलरुमची स्थापना करण्यात आल्याची माहिती रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी दिली.
►
ज्यांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, दम लागणे व अंगदुखी असेल त्यांनी तातडीने रुईच्या रुग्णालयात तपासणीसाठी जायचे आहे. ज्यांची लक्षणे कोरोनासदृश असतील त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते लगेचच एमआयडीसीतील मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्याला तेथेच दाखल करुन घेतले जाणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी सांगितले.
►
दरम्यान, वरील लक्षणाखेरीज इतर लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्यांनी बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात जायचे आहे. तर गरोदर मातांनी एमआयडीसीतील महिला ग्रामीण रुग्णालयात जायचे असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले. रुई ग्रामीण रुग्णालयात वरील लक्षणांखेरीजच्या इतर रुग्णांनी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.