-->
माळेगाव कारखान्याच्या अपघाताची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

माळेगाव कारखान्याच्या अपघाताची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

माळेगाव ः माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी सकाळी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार यांनी थेट हॉस्पिटल गाठले.


कारखान्यात एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन वायू तयार होऊन नऊ कामगार गुदमरले होते. बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार यांनी थेट हॉस्पिटल गाठले.


या वेळी पवार यांच्यासमवेत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे, दत्तात्रेय भोसले आदी संचालक उपस्थित होते.


संबंधित पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केली. या वेळी पवार यांनी वैद्यकीय उपचार योग्यरित्या होण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केली. माळेगावच्या जखमी कामगारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.


माळेगाव ः माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानंतर यंत्रसामग्रीची स्वच्छता करताना शनिवारी अपघात झाला. एका पॅन टाकीची स्वच्छता करताना गॅस तयार होऊन नऊ कामगार गुदमरले. त्यामध्ये दोन कामगार बेशुद्ध अवस्थेत आहेत, त्यातील रामभाऊ येळे (माळेगाव, ता. बारामती), जालिंदर भोसले (निरावागज, ता. बारामती) यांचा समावेश आहे.


जखमी सर्व कामगारांवर बारामती शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांच्या संचालक मंडळींनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत उपाय योजनांना सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी व जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी कामगार बाळासाहेब ढमाळ, सुनील आटोळे आणि सोमा चव्हाण यांनी वेळीच जखमी कामगारांना मदत केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.


माळेगाव कारखान्याच्या जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे : रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज), शिवाजी भोसले (खांडज), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी, जि. सोलापूर), घनश्‍याम निंबाळकर (भिकोबा नगर-धुमाळवाडी), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी).



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article