वडगांव व मुर्टी येथे सापडलेले कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील कोरोनाबाधित सत्तर वर्षाच्या आजींनी तर मुर्टी (ता. बारामती ) येथील मुंबई वरून आलेल्या पितापुत्राने कोरोनावर मात केली असून आज त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती तालुक्याती वडगाव निंबाळकर येथील जगताप वस्तीवर मुलीला भेटण्यासाठी संबंधित महिला 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईहून आली होती. दरम्यान तिला यापूर्वीच ताप येत होता. घशातही खो- खो होत होती. पेशी कमी झाल्याने हवापालट करण्यासाठी मुंबईहून वडगावला त्या आल्या होत्या. मात्र, येथेही त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले. ससूनमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 12 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील बारच्या बारा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने वडगाव निंबाळकर गावासाठी, बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आली. दहा दिवस ससून रुग्णालयात उपचार घेत सत्तर वर्षाच्या आजींची कोरोनावर मात करून ससून रुग्णालयातुन घरी परतल्या आहेत.
मुंबई वरून आपल्या मूळ गावी आलेल्या एका व्यक्तीची तब्बेत बिघडल्याने त्याची गावातच तपासणी करून उपचार करण्यात आले होते मात्र त्यानंतर ही त्याला बरे न वाटल्याने मोरगाव येथे नेऊन त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी शंका आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात तो व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरच्यांची तपासणी केल्या नंतर त्या व्यक्तीचा मुलगा कोरोना बाधीत निघाला होता, त्या दोघांवर उपचार सुरू होते. मात्र आज त्या दोघा पिता पुत्राने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.