-->
यंदा बारामती तालुका झाला टँकरमुक्त....

यंदा बारामती तालुका झाला टँकरमुक्त....

बारामती : गतवर्षाचा झालेला चांगला पाऊस आणि जलसंधारणाची झालेली चांगली कामे यामुळे यंदा बारामती तालुका टँकरमुक्त झाला. अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच बारामती तालुक्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी झाली नाही.


बारामती तालुक्यातील अनेक गावे टंचाईग्रस्त म्हणून ओळखली जातात. दरवर्षी जानेवारीपासूनच टँकरसाठी मागणी जोर धरु लागते. जून महिन्यात चांगला पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गतवर्षी बारामती तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने विहीरींच्या पाण्याची पातळी चांगली वाढली होती. जमिनीतही पाणी चांगले मुरलेले असल्यानेही फरक पडला.



बारामती तालुक्याचा विचार करता सन 2015-2016 मध्ये 34 (22 गावे व 255 वाड्या वस्त्या) , 2016-2017 मध्ये 21 (21-233), सन 2017-2018 मध्ये 27(18-249) , सन 2018-2019 (21-316) मध्ये 37 तर 2019-2020 (33- 361) या कालावधीत तब्बल 49 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला.


मोठ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याचे पाणी द्यावे लागत होते.



यंदा मात्र मे महिन्याचे तीन आठवडे उलटूनही टँकरची फारशी मागणी नाही, त्या मुळे यंदाचा उन्हाळा तुलनेने सुसह्य झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे बारामती तालुक्याच्या विविध भागात जी जलसंधारणाची कामे झाली होती, त्यात चांगले पाणी साठून राहिले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. विहीरींच्या पाण्याची पातळी उंचावली, त्याचा फायदा यंदा टँकरमुक्तीत दिसून आला.



पावसाचे पाणी व्यवस्थित साठून राहिले तर त्याचा फायदा उन्हाळ्यात निश्चितपणे होते हेच यंदा सिद्ध झाले. ओढा खोलीकरण रुंदीकरण, सलग समतल चर निर्मिती, बांधबंदीस्ती, विहीरींची दुरुस्ती, तलावातील गाळ काढणे अशा अनेक गोष्टींमुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच संपुष्टात आला.


पावसाचे पाणी वाहून जाऊ देऊ नका...


पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून साठवून ठेवला पाहिजे, जेणेकरुन उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. जलसंधारणाच्या कामांसह पाणी बचतीसही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.


- राहुल काळभोर, गटविकास अधिकारी, बारामती.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article