-->
जिल्ह्य़ातील १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा; बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश

जिल्ह्य़ातील १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा; बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश

पुणे : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंच या पदांच्या रिक्त जागांची निवड प्रक्रिया करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्य़ातील १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी या पदांच्या निवडीला स्थगिती दिली होती. राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी सरपंच आणि उपसरपंच यांचे राजीनामे घेऊन नवीन निवडीबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. आता राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या बैठका घेऊन निवड प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्य़ातील १४०० सरपंचांची निवड प्रक्रिया होऊ शकणार आहे.


जिल्ह्य़ातील १४०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत २७ मार्चला काढण्यात येणार होती.


ही प्रक्रिया राबवून आता जिल्ह्य़ातील सरपंच पदांच्या निवडी होणार आहेत. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत, ७५० ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम आणि सहा ग्रामपंचायतींसाठी मार्चअखेरीस होणारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यापूर्वी दिले होते. त्यापैकी सरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


दरम्यान, जिल्ह्य़ात बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी आणि भिवरी, दौंड तालुक्यातील बिरोवावाडी अशा सहा ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या दरम्यान संपणार आहे.


या निवडणुकांसाठी २९ मार्चला मतदान, ३० मार्चला मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने आखला होता. मात्र, सध्या या प्रक्रियेला स्थगिती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्य़ातील ७५० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. सुनावणी घेऊन २१ मार्चला प्रभागरचना प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले होते, ही प्रक्रिया स्थगित आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article