बारामती - जीवे मारण्याची धमकी देत तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार
बारामती - बारामती तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील एका गावामध्ये तेरा वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अश्शील चाळे करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ७४ वर्षीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या चुलतीने आरोपी कुंडलीक बापुराव जाधव ( वय ७४ ) याच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक करून बारामतीच्या न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस ( २७ मे ) पर्यंत कोठडी सुनावली आहे.
घडलेला प्रकार असा की मंगळवार ( दि.१९ ) रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तेरा वर्षीय पीडित मुलीला आरोपीने आपल्या घराजवळ असणाऱ्या शौचालयात जाण्यासाठी सांगून तिला विवस्त्र करून अश्शील चाळे केले. त्यानंतर आरोपीने झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तूझा जागीच जिव घेईन अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलीने झालेल्या प्रकारा बाबत घाबरून जाऊन कोणाला काहीच सांगितले नाही. यानंतर रविवार ( दि.२४ ) पीडित मुलगी आपल्या चुलतीकडे गेली होती.
दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याचे आपल्या चुलतीला सांगितले, मात्र, मुलीचा हावभाव ओळखत चूलतिच्या मनात शंका उपस्थित झाल्याने विचारपूस केली असता प्रथम चुलतीला सर्व हकीकत सांगितली यानंतर आई, वडील यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानुसार पिडितेच्या चुलतीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. घडलेल्या ठिकाणी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकारची सविस्तर माहिती घेतली. याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.एन.साळुंके हे अधिक तपास करीत आहेत.