बारामती- फलटण रस्त्यावर चेकपोस्टवर प्रशासनाची कडेकोट तपासणी
बारामती / प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या धरतीवर सावधानता बाळगण्यासाठी राज्यभरात चेकपोस्ट उभारण्यात आले असून नवीन येणाऱ्या लोकांची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती फलटण रस्त्यावर सांगवी (ता.बारामती) येथे चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सध्या सांगवी येथे सातारा, सांगली, कोल्हापूर व इतर जिल्ह्यातून अनेक वाहने येत आहेत त्यामुळे आरोग्य विभागाकडून इन्फ्रारीड डिजिटल थर्मामीटरच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची तापमानाची तपासणी करून कोणते लक्षणे आढळून येतात का याची माहिती विचारून नोंदणी करण्यात येत आहे. तर सांगवी आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शिरष्णे, लाटे, माळवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावगज, मेखळी, या उपकेंद्रात पुणे मुंबई व इतर गावांतून आलेल्या १२८ नवीन लोकांची नोंदणी झालेली असल्याची माहिती सांगवी आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी डॉ. जनार्दन सोरटे यांनी दिली.
सातारा व पुणे सीमेवर सांगवी येथे चेक पोस्ट स्थळावर बारामती ग्रामीण पोलीसांचा बंदोबस्त असून आरोग्य विभाग पोलीस पाटील व शिक्षक काम पहात आहेत. चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी सुरू असल्याने बारामती फलटण रस्त्यावर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. तर त्यांची वहीमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. तर सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांकडे जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस, आर. टी. ओ यांचा पास असेल तरच पोलिसांकडून पूढे सोडण्यात येत आहे.
पास नसलेल्या वाहनांना माघारी पाठवण्यात येत आहे. सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या एकुण ९ उपकेंद्रांतील गावांमध्ये मुंबई पुणे वरून नोकरी साठी गुंतून राहिलेल्या एकुण १२८ जणांना १४ दिवस होमकॉरनटाइन करण्यात आले आहे. तर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरीच १४ दिवस राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. तर होमकॉरनटाइन केलेल्याची दररोज तपासणी देखील करण्यात येत असल्याची माहिती सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.जनार्दन सोरटे यांनी दिली. सांगवी येथील चेकपोस्ट वर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक निरीक्षक प्रमोद पोरे पाहणी करत आहेत. तर पोलीस पोलीस राजेंद्र काळे, अमोल खांडेकर, सांगवीचे पोलीस पाटील राजेंद्र तावरे, शिरवलीचे पोलीस पाटील नितीन घनवट, व शिक्षक अंकुश शिंदे, रामचंद्र लांडगे, पोलीस मित्र अजित भोसले, होमगार्ड रमजान डांगे हे वाहनांची तपासणी दरम्यान कामकाज पहात आहेत.