लॉकडाऊन असतानाही वडगांव पोलिस स्टेशन हद्दीत मटका व्यवसाय तेजीत
कोऱ्हाळे बु- राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. गेली दोन महिने अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद असताना बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मटका व्यवसाय चालू आहे. कोरोना व्हायरस संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिस यंत्रणा व्यस्त असताना सर्व नागरिक घरात बसून आरोग्याची काळजी घेत आहेत. अशातच मटका खेळणाऱ्या शौकिनांचे दोन पैसे काढून घ्यावे म्हणून मटका व्यवसायिकांनी मटका चालू ठेवला आहे. तालुक्यात शहरासह कटफळ, मुरटी व वडगांव निंबाळकर तसेच माळेगाव मध्ये कोरोनाचे पेशंट सापडल्याने चारही गावे पूर्णपणे सील आहेत. स्थानिक प्रशासनाने सावधगिरी म्हणून हॉस्पिटल, मेडिकल, दूध वगळता बँका, किराणा व इतर दुकाने बंद केली आहेत. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वडगांव निंबाळकर येथील स्मशानभूमीशेजारी भाऊ माने, करंजे सोमेश्वर मंदिर परिसरात एका पुजाऱ्याकडून तर कोऱ्हाळे बु व सुपा तसेच निरा येथील बुआसाहेब चौकात मटक्याचे राजरोसपणे बुकिंग सुरू आहे. तरी डीवायएसपी नारायण शिरगावकर व अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी लक्ष घालण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
संग्रहित छायाचित्र