कोरोनासंसर्ग झाल्याचे सांगवी परिसरात अफवेचे वादळ
बारामती - सांगवी ( ता.बारामती ) येथे कोरोनासंसर्ग झाल्याची चर्चा जोरदार सुरू असून सांगवी व परिसरातील नागरिकांच्यात विनाकारण अफवेचे वादळ सुटले आहे. यामुळे नागरिकांच्यात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनाकारण अनेक लोकांना फोन येत उलटसुलट माहिती व गैरसमज पसरवून नागरिकांच्यात घबराट निर्माण केली जात आहे.
फलटण येथे बाजार मार्केट मध्ये हमाली करणारी एक व्यक्ती ( १८ मे ) रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारा दरम्यान उपस्थित राहून सर्व तयारी करत होती. शुक्रवारी (दि.२२ ) रोजी सांगवी येथील एक व्यक्ती भाजीपाला खरेदीसाठी फलटणच्या मार्केटला गेली होती. दरम्यान अंत्यसंस्कारावेळी हजर असलेल्या हमाल व्यक्तीच्या संपर्कात ही व्यक्ती आली होती. तर मृत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या घरातील चार व्यक्तींची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबाबत आज शनिवार (दि.२३ ) रोजी त्या हमालाला देखील संशयित म्हणून सातारा येथे चाचणीसाठी घेऊन गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्या व्यक्तीचा अहवाल नेमका काय येतोय याकडे लक्ष लागले आहे. याबाबत बारामती तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे यांना फलटणहून एका व्यक्तीने संपर्क साधून सर्व माहिती दिली होती. त्यानुसार किरण तावरे यांनी ग्रामपंचायतला माहिती कळवून सांगवी ग्रामपंचायतच्या सरपंच स्वाती तावरे, उपसरपंच पोपट तावरे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जगताप, प्रशांत तावरे यांनी तत्पर सर्व चौकशी करत दक्षता म्हणून भाजीपाला खरेदी करून आलेल्या व्यक्तीच्या घरातील सर्व सदस्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी केली. व त्यांना होम क्वारंटाइन देखील करण्यास सांगितले आहे.
तर सदर व्यक्ती आपल्या दुकानात खबरदारी म्हणून प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरद्वारे सुरक्षितता बाळगत होते. तर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी देखील दरम्यान निर्जन्तुकीकरणासाठी गावात फवारणी केली करून दुकान बंद केले आहे. सांगवी हे गाव बारामती फलटण या राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने दररोज पाच ते सहा जिल्ह्यातून अनेक वाहने या रस्त्याने जात आहेत. याठिकाणी ग्रामीण पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग व शिक्षक कर्मचारी चांगल्याप्रकारे काम हाताळत आहेत.बारामती तालुक्यातील चार ते पाच गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच गेली तीन महिन्यांपासून सांगवी ग्रामपंचायत स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात दुकाने उघडण्यासाठी वेळेचे बंधन देऊन, लोकांची गर्दी रोखण्यासाठी मोठ्या हालचाली करत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर सांगवी हे गाव असून देखील अध्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे ग्रामपंचायतच्या कामाची पावती दिसून येत आहे.गेली पाच ते सहा दिवसांत सांगवी येथे बाहेरून आलेल्या एकुण ३८ जणांना होम क्वारंनटाइन केले असून, लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जनार्दन सोरटे यांनी दिली आहे.
गावात कोणत्याही प्रकारची विनाकारण अफवा पसरवून नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण करू नये. कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी ग्रामपंचायतकडून युद्धपातळीवर दक्षता घेत असून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती तावरे, उपसरपंच पोपट तावरे यांनी सांगितले.
सांगवी परिसरात कोणत्याही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला नसून, विनाकारण एखाद्या व्यक्तीबाबत अफवा व गैरसमज पसरवून बदनामी करत लोकांच्यात भिती पसरवणाऱ्यावर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात येईल – प्रमोद पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस स्टेशन