-->
राज्यातील हजारो वकिलांना ऑनलाइन धडे

राज्यातील हजारो वकिलांना ऑनलाइन धडे

बारामती - देशभरात उद्‌भवलेल्या करोनाच्या गंभीर संकटाने अपवादात्मक गंभीर खटले वगळता सर्वच न्यायालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्येही न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, तज्ज्ञ मंडळी राज्यभरातील वकील, वकिलीचे विद्यार्थी व नवोदित न्यायाधीशांना विनामोबदला मार्गदर्शन करीत आहेत.


बारामती वकील संघटनेद्वारे ऍड. डॉ. सुधाकर आव्हाड यांचे दिवाणी कायद्यातील नवनवीन बदल, रेरा कायद्याची माहिती, ऍड. डॉ. उदय वारुंजीकर यांचे करोनानंतर वकिल न्यायाधीशांना येणाऱ्या संधी, ऍड. पंकज सुतार यांचा करोनाबाबत सरकारचा असलेला कायदा त्याची तरतूद, ऍड. अविनाश भिडे यांच्या फौजदारी कायद्यातील पंचनामाचे महत्त्व आदी विषयांवर लेक्‍चर झाले.


बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत सोकटे व सहकारी मित्र या वेबिनारसाठी मदत करीत आहेत.


पुणे येथील जन अदालत संस्थेमार्फत देखील ऍड. सागर नेवसे यांनी त्यांच्या सहकारी वकील वर्गाद्वारे आतापर्यंत 23 लेक्‍चरचे आयोजन केले आहे. सोलापूरमध्ये देखील आतापर्यंत 13 लेक्‍चर झाले असून ऍड. नितीन ठाकरे, ऍड. बसवराज सलगर, ऍड. गोपीनाथ तिडके व ऍड. शरद गायधने या वेबिनारचे आयोजन करीत आहेत.


बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष अविनाश भिडे यांनी फौजदारी कायद्यातील विविध तरतुदीवर स्वत: अनेक मार्गदर्शनपर व्याख्याने तर केलीच पण नाशिक वकील संघटनेद्वारे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष ऍड. जयंतराव जायभाये, ऍड. नितीन ठाकरे, ऍड. गोपीनाथ भिडे, ऍड. शरद गायधने आदींच्या सहकार्याने 35 ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन केले असून आजतागायत 16 व्याख्याने त्यांनी पूर्ण केली आहेत.


याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. सी. चव्हाण, न्यायाधीश गौतम पटेल हे ऑनलाइन व्याख्यान देत आहेत. ज्येष्ठ वकील ऍड. भास्करराव आव्हाड, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. अहमदखान पठाण यांनी फौजदारी कायदा, ऍड. अरविंद आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व राज्यघटनेतील तरतुदी अशा विषयांवर व्याख्याने दिली आहेत.



लॉकडाऊनमध्ये वरिष्ठ वकिलांचे मार्गदर्शन घरबसल्या मिळत असून एक चांगली संधी वकिलांना मिळाली आहे. तिचे त्यांनी सोने करावे.
- ऍड. सुधाकर आव्हाड,
माजी अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा


लॉकडाऊननंतर न्यायालयाच्या कामकाज पद्धतीत मोठा बदल होईल. न्यायालयाचे बहुतांश कामकाज ऑनलाइन होणार आहे. दावे देखील ऑनलाइन दाखल करावे लागतील, त्यामुळे आता सगळ्यांनीच ऑनलाइनचे तंत्रज्ञान समजून घेण्याची गरज आहे.
- ऍड. डॉ. उदय वारुंजीकर,
सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा


व्याख्यानामुळे नवोदित वकिलांना व न्यायाधीश परीक्षा देणाऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे नाशिक, पुणे, सोलापूरची माहितीदेखील आम्ही तयार केलेल्या ग्रुपवर देतो. त्यामुळे फक्‍त आमचेच नाही तर इतरांनी आयोजित लेक्‍चरचादेखील सर्वांना लाभ होतो.
ऍड. गणेश आळंदीकर,
बारामती, तथा समन्वयक, ऑनलाइन लेक्‍चर


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article