-->
कोऱ्हाळे बु गावची सिमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

कोऱ्हाळे बु गावची सिमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

कोऱ्हाळे बु|| गावात ९० वर्षीय जेष्ठ कोरोना बाधित आढळल्याने कोऱ्हाळे बुद्रुक गाव पुढील २८ दिवस बंद राहणार असल्याची माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

    कोणताही प्रवास इतिहास नसलेले ९० वर्षीय जेष्ठ कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र त्यांचा मुलगा ड्रायव्हर असल्याने त्या मुलापासून त्यांना कोरोना झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आश्चयाची बाब म्हणजे त्याचा मुलगा मात्र कोरोना निगेटिव्ह आहे.

   ही माहिती मिळताच बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गावात धाव घेत बैठक घेतली. यावेळी तहसीलदार विजय पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर व गावातील पदाधिकारी, शासकिय अधिकारी उपस्थित होते.


   यावेळी कांबळे म्हणाले की गावाची महसुली सीमा सील करण्यात येणार असून ३ किमीचा परिसर कंटेंमेंट झोन तर ५ किमी चा परिसर बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने , व्यवहार बंदच राहणार आहेत. या दरम्यान कुणी ही घराबाहेर व गावाबाहेर पडू नये. तसेच कुणालाही गावात प्रवेश देऊ नये. बाहेर गावाहून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे. गावात सॅनिटाईझरची फवारणी करावी, प्रत्येकाने मास्क वापरावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. सुरुवातीचे काही दिवस किराणा दुकाने बंद राहणार आहेत मात्र त्यानंतर किराणा दुकाने उघडण्यात येणार आहेत. केवळ गावातील लोकांनाच किराणा माल द्यावा असे आवाहन करून बाहेरील लोकांना किराणा माल दिल्याचे आढळल्यास दुकाने सील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे म्हणाले की आरोग्य विभागाच्या २६ टीम गावातील १४०० कुटुंबाची तपासणी करणार असून संशयित व्यक्तींना पुढील तपासणी साठी बारामतीला पाठवणार आहेत.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article