निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नामांतराची मागणी
निरा- पुरंदर व बारामती तालुका कार्यक्षेत्र असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामांतर करून सहकार महर्षी मुगुटराव काकडे देशमुख यांचे नाव देण्याची मागणी निरा बचाव कृती समितीने केली आहे.
सन 1956 साली मुगुटराव काकडे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली स्थापनेनंतर संस्थापक सभापती यांच्या काळात येथे गूळ, कांदा, कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. शेतकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला व मजुरांना रोजगार मिळत होता. सन 1992 पासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संजय जगताप यांचे मार्केट कमेटीवर संयुक्त वर्चस्व आहे. गेली 5 वर्षापासून कापूस, कांदा लिलाव बंद झाले. आता फक्त निरा मार्केट आवारात गूळ व सासवड उपबाजारात धान्याची आवक होते. पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी निरा मार्केट कमेटीने मार्केट कमिटीला स्व. सहकार महर्षी मुगुटराव काकडे देशमुख यांचे नाव देऊन निरा येथेही धान्याचे व भाजीपाल्याचे मार्केट सुरू करावे असे निरा बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुधीर शहा यांनी सांगितले.