बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
१६ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याची घटना बारामती शहरात घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी आकाश एकनाथ शिंदे ( रा. गणेश मंगल कार्यालयाजवळ, यवत, ता. दौंड) याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बाल लैंगिक अपराध कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बारामती शहरात राहणाऱ्या अल्पवयीन पीडिताने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दि. २० मे व ६ जून रोजी रात्री एक ते पहाटे तीन या कालावधीत बारामती शहरातील निरा डावा कालव्यालगत इरिगेशन कॉलनी येथे ही घटना घडली आहे.
यवतमधील गणेश मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या आरोपीची व फिर्यादीची यवत रेल्वे स्थानकावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे अमिष दाखवले. त्यातूनच दि. २० मे व ६ जून रोजी रात्री एक ते तीन या वेळेत त्याने खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगत पीडितेला दुचाकीवरुन इरिगेशन कॉलनी येथे नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबध प्रस्थापित केले. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे पुढील तपास करत आहेत.