-->
बारामतीकरांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार

बारामतीकरांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार

बारामती  : बारामतीतीलसहा मजली 500 खाटांच्या क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित शासकीय रुग्णालयाचे काम आता मार्गी लागले आहे. या रुग्णालयाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या मेडीकल गॅस पाईपलाईन, ऑक्सिजन प्लँट व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 11 ऑपरेशन थिएटर्सच्या कामाची जबाबदारी हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कंपनीवर सोपविण्यात आली असून, कामास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती या महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी दिली.


ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या कामासाठी 59 कोटी रुपयांचा निधी मिळविला होता.


दरम्यान सत्तांतरानंतर अजित पवार यांनी पाठपुरावा करुन मेडिकल फर्निचरसाठी 18 कोटींचा निधी मिळवून दिला आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बाह्यसुशोभिकरण व इतर फर्निचरच्या कामासाठी 46 कोटींची निधी दिला जाणार आहे. या रुग्णालयात दुस-या टप्प्यात हृदयशस्त्रक्रीया वच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीही करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.


काय होणार फायदे अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या 500 खाटांच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयामुळे पुण्याच्या ससून रुग्णालयावरचा ताण कमी होणार आहे. विविध वैद्यकीय प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नसून, बारामतीतच ती दिली जातील. सर्व रुग्णांवर अल्प दरात उपचार व शस्त्रक्रीया होतील, तसेच नव्याने मोठ्या रक्तपेढीची स्थापना या रुग्णालयात होणार आहे. त्यामुळे रक्ताची गरजही येथे भागवली जाईल.


अत्याधुनिक दर्जाची यंत्रणा
या रुग्णालयात शासकीय दरात सिटी स्कॅन, एमआरआय व मॅमोग्राफीचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अल्प उत्पन्न शिधापत्रिकाधारकांना काही सुविधा मोफतही मिळणार आहेत. मात्र, या रुग्णालयामुळे पंचक्रोशीतील रुग्णांच्या वैदयकीय खर्चात प्रचंड कपात होईल, असा विश्वास डॉ. तांबे यांनी व्यक्त केला.


कोणत्या शस्त्रक्रीया होतील या रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाची 11 मोड्युलर ऑपरेशन थिएटर्स असून, डोळा, कान, नाक, घसा, स्त्रीरोग प्रसूती व तत्सम, अस्थिरोग व इतर शल्यचिकित्सेशी संबंधित सर्व शस्त्रक्रीया येथे होतील. 24 तास सेवा उपलब्ध असल्याने पुण्याला जाण्याचे प्रमाण कमी होईल. या रुग्णालयात महत्वाचे असलेले शवविच्छेदनही होणार असून, अवयवदानाची चळवळही येथे राबविली जाणार आहे. ज्यांना देहदान करायचे आहे, असे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्विकारण्याचीही सोय होणार आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article