
कोऱ्हाळेकर काळजीत ...... नेते मात्र बारामतीत...
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. बारामती तालुका सध्या कोरोनामुक्त झाला असला तरी याच महिन्यात कोऱ्हाळे बुद्रुक गावात कोरोनाचे चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले होते त्यामुळे गाव २८ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत त्यामुळे गावकरी काळजीत त्रस्त असताना गावातील पुढारी मात्र बारामतीत मस्त आहेत.
कोऱ्हाळे बुद्रुक हे बारामती तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे. त्यामुळे गावात अनेक पुढारी आहेत. त्यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशमामा खोमणे, बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप बापू धापटे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, सोमेश्वर कारखान्याचे दुसरे संचालक लालासाहेब माळशिकारे, माजी संचालक शेखर आण्णा खंडागळे यांचा समावेश आहे. यातील शेखर अण्णांनी गावातील सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्या सारखा आहे. मात्र इतर सर्व नेते गावातील राजकारण करत असतात. मात्र सध्या या सर्व नेत्यांचा मुक्काम बारामतीत असतो. त्यामुळे गावातील सर्व लोकांना या गाव पुढाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिल्यात जमा आहे.
गावातील ग्रामपंचायतीवर सध्या सुनील भगत यांच्या पार्टीची सत्ता आहे. पंधरा पैकी अकरा सदस्य त्यांच्या पॅनलचे निवडून आले आहेत. त्यामुळे गावातील लोकांची कलजो घेणे त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र सध्या ते बारामतीत राहायला असतात. गावात त्यांची उपस्थिती फक्त विकासकामांचे भूमिपूजन असल्यावरच किंवा एखादा मोठा अधिकारी, पदाधिकारी गावात आल्यावरच असते. शिवाय सध्या ते राजकारणा पेक्षा फेसबुकवर जास्त सक्रिय असतात. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतांचा जोगवा मागायला ते घरोघरी फिरले होते मात्र आता कोरोना संकटाच्या काळात गावातील लोकांना मदतीची गरज असताना ना ते गावात येऊन लोकांना धीर देतात ना मदत करण्याचे औदार्य दाखवतात ना लोकांची विचारपूस करतात. त्यांच्या विश्वात ते मश्गुल असतात.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशमामांकडे ही अनेक वर्षे गावाची सत्ता होती. गावातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक घटकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र आता त्यांचेही गावातील लक्ष कमी झाले आहे. ते ही सध्या फक्त वाचनालय व सिद्धेश्वर हायस्कुल मध्ये असतात. मात्र कोरोना काळात त्यांचा गावातील वावर कमी झाला आहे. वास्तविक त्यांनी आपले संबंध वापरून गावातील लोकांपर्यंत मदत आणता आली असती पण त्यांनी तसे केले नाही.
सोमेश्वर करखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक लालासाहेब माळशिकारे यांचा मुक्काम ही सध्या बारामतीतच असतो. बारामती पंचायत समितीचे उपसभापती ही गेली अनेक वर्षे बारामतीत राहतात. ते गावात त्यांच्या व्यावसायिक कारणासाठी येत असतात.
खरं तर तीन महिन्यांपासून गाव बंद आहे. लॉकडाउन मुळे गावतील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची तर अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मजूर वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत स्वतःला पुढारी म्हणवून घेणाऱ्यांनी गावातील लोकांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. माळेगाव येथे रविराज चिकू पाटलांनी ट्रेलर भरून किराणा वाटला तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी ही आपल्या होळ या गावात सर्व कुटुंबाना किराणा मालाचे व भाजीपाला वाटप केला. असा नेत्यांकडुन आपल्या गावातील नेत्यांनी आदर्श घेतला पाहिजे. केवळ मतांसाठी व राजकारणासाठी लोकांचा वापर करणे आता थांबवा नाहीतर जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
जनता आहे म्हणून पुढारी आहेत हे कदाचित पुढारी विसरले आहेत. गाव प्रतिबंधित क्षेत्र असताना गावकऱ्यांच्या समस्या तरी पुढाऱ्यांनी जाणून घ्यायला हव्या होत्या. नेते आले की मात्र त्यांच्या पुढे पुढे करण्यात हे आघाडीवर असतात. लवकरच कोऱ्हाळे गावाची ग्रामपंचायत निवडणूक येत आहे त्यावेळी मते मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना कोरोना काळात तुम्ही कुठल्या बिळात होता असा जाब विचारल्या शिवाय जनता गप्प बसणार नाही हे मात्र नक्की.
सदर बातमीचा खुलासा
दि. 19 रोजी साप्ताहिक निरा बारामती वार्ताच्या पोर्टलवर प्रतिनिधीकडून आलेली बातमी (वरती असणारी) प्रसिद्ध करण्यात आली. सदर बातमीत नजरचुकीने सुनील भगत यांच्या बद्दल शिवाय ते राजकारणापेक्षा फेसबुकवर जास्त सक्रिय असतात व ते सध्या बारामतीत राहायला असतात असे प्रसिद्ध झाले आहे. सदर शब्द पूर्णपणे मागे घेण्यात येत आहे.
- *संपादक*