बारामती : शाळेत शिपाई पदाच्या नोकरीसाठी ९ लाख घेत फसवणूक
शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरीला लावतो असे सांगत दोघांकडून ९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रामेश्वरी नितीन जाधव व नितीन तानाजी जाधव या दोघांविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शनिवारीच (दि. २७) नितीन जाधव याच्यावर शिक्षक भरतीसाठी १४ लाख रुपये घेतल्याचा गुन्हा बारामतीत दाखल झाला होता.
नेमके काय घडले?
याप्रकरणी मंगलसिंग गारद्या वसावे (रा. काकडदा, ता. धनगाव, जि. नंदूरबार) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार वसावे व त्यांचा मेहुणा संजय नरसिंग गावीत (रा. बंदारवाडा, पो. सोनगीर फाटा, ता. नंदूरबार) या दोघांची यात फसवणूक झाली आहे. या संस्थेने २०१२-१३ मध्ये वृत्तपत्रात विविध पदे भरण्यासंबंधी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून फिर्यादीने संपर्क केला असता त्यांना बारामतीत येण्यास सांगण्यात आले.
बारामतीजवळील कऱहावागज येथील मुकबधीर शाळेवर बोलावून घेतल्यानंतर रामेश्वरी जाधव यांनी आमची कऱहावागज व बाळू पाटलाचीवाडी (लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) तेथे शाळा आहे. तेथे तुम्हाला शिपाई पदाची नोकरी मिळेल परंतु त्यासाठी दोघांचे ९ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत असे फिर्यादीने सांगितल्यावर पैसे दिले तरच नोकरी मिळेल, आमची संस्था अनुदानित आहे, असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीनंतर फिर्यादी व त्यांच्या मेहुण्याने ४ लाख रुपये आणून दिले.
कऱहावागज येथे रामेश्वरी व नितीन जाधव यांनी ही रक्कम स्विकारली. त्यानंतर उरलेले पाच लाख रुपये देण्यासाठी दोन, तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. ऊसनवारी करत या दोघांनी पाच लाखांची रक्कमही आणून दिली. त्यानंतर त्यांना स्वामी समर्थ निवासी मुकबधीर विद्यालय बाळू पाटलाची वाडी येथे शिपाई पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या दोघांनी त्या ठिकाणी चार वर्षे काम केले. परंतु आरोपींनी त्यांना कसलाही पगार दिला नाही. पगाराबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याच कालावधीत या दोघा आरोपी दांपत्याने आमची शिवमुद्रा सहकारी पतसंस्था बारामतीत आहे. तेथे मुदत ठेव ठेवा. चार वर्षात पैसे दुप्पट होतील असे अमिष दाखवत फिर्यादीला ८० हजार रुपये भरायला लावले. दरम्यान पगार मिळत नसल्याने या दोघांना २०१७ मध्ये नोकरी सोडली.
भरलेल्या पैशाची मागणी केली असता आरोपींकडून आयसीआयसीआय बॅंकेचा ९ लाखांचा धनादेश देण्यात आला. परंतु तो वटला नाही. आज देवू उद्या देवू असे करत वेळ मारून नेण्यात आली. सैन्य दलातील नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी गत आठवड्यात नितीन जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला. वृत्तपत्रात ती बातमी वाचल्यानंतर फिर्यादीने याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली.
दांपत्यावरील पहिला तर नितीन जाधववरील तिसरा गुन्हा
नितीन जाधव याच्यावर गत आठवड्यात सैन्य दलातील नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याचा गुन्हा भिगवण पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर शनिवारी बारामतीत त्याच्यासह गणेश कमलाकर गोडसे (रा. कऱहाड, जि. सातारा) या दोघांवर शिक्षक भरतीसाठी १४ लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दांपत्यावर आता पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तर नितीन याच्यावर दोन आठवड्यात तिसरा फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.