-->
हुमणीच्या भुंगेऱ्याला सोमेश्वर कारखान्याकडून प्रतिकिलो ३०० रुपये दर

हुमणीच्या भुंगेऱ्याला सोमेश्वर कारखान्याकडून प्रतिकिलो ३०० रुपये दर

सोमेश्वरनगर - हुमणी नियंत्रणासाठी बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतातच किडीचे नियंत्रण करून भुंगेऱ्यांची आठवड्यातून प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी कारखान्याच्या ऊस विकास विभागात विक्री करावी. त्यासाठी कारखान्याकडून प्रति किलो ३०० रुपये दर दिला जाईल, असे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे.


            हुमणीचा प्रादुर्भाव काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात. त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीकच वाळते. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.


          हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (जून ते ऑगस्ट) करणे महत्त्वाचे आहे. हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होते. असे असले तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकांच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक जास्त प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक आहे.


            हुमणी किडीच्या अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला सूर्यास्तानंतर खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हे होय. या झाडावरील फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून
मारावेत. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायामध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नियंत्रण सुरू करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article