बारामतीत सापडले कोरोनाचे 6 नवे रुग्ण
कोरोनामुक्त बारामतीतून हळूहळू कोरोना पाय वर काढत असतानाच आज कोरोनाने बारामतीत थेट षटकार ठोकला. या सहा नव्या कोरोना रुग्णांमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे.
आज बारामतीत नव्याने सहा रुग्ण आढळले. यामध्ये बारामतीतील अर्बनग्राम मधील आयटी अभियंत्याच्या संपर्कातील काटेवाडीतील दोन जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले. आयटी अभियंत्याचे नातेवाईक असलेले हे दोघे जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत. सावळ येथे राहणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यासही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील तांबेनगर येथे नव्याने एक रुग्ण आढळून आला असून एका ज्येष्ठ वकीलांच्या पत्नीसही कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यतिरिक्त एका मुलास कोरोनाची बाधा झाली असून हा राजकीय पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
आता गेल्या काही दिवसांतच अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दौंड, इंदापूरपाठोपाठ बारामतीतही एकाच वेळी सहा रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊननंतर अनलॉकच्या दिशेने जात असताना सोशल डिस्टन्सिंगचा उडलेला बोजवारा व कंटेन्मेंट झोनमधील प्रवास यामुळेही बारामतीतील रुग्ण वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. बारामतीतील ज्येष्ठ व अतिमहत्वाच्या असलेल्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याचा मुलगाच कोरोनाबाधित आढळल्याने अनेकांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.