दहा वर्षांनंतर बारामतीवर वरुणराजाची कृपादृष्टी
जून महिन्यात यंदा पावसाने गाठली सरासरी : अनिश्चित खरिपाची आली शाश्वती
बारामती - तब्बल दहा वर्षांनंतर जून महिन्यात वरुणराजाची कृपादृष्टी बारामतीवर झाली आहे. जून महिन्यातील पावसाने सरासरी गाठली आहे. वेळेत सुरू झालेल्या पावसामुळे अनिश्चित खरीप हंगामाला शाश्वती आली आहे. तालुक्यातील बळीराजा त्यामुळे सुखावला आहे.
बारामती तालुक्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगाम अनिश्चित स्वरुपाचा मानला जातो. यंदा मात्र तालुक्यातील सातही मंडळात पावसाने जून महिन्यातच हजेरी लावली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये 13 हजार 572 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
गतवर्षी पावसाने हजेरी लावली मात्र उशिरा आलेल्या पावसामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली नाही. यंदा जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरिपाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, जिरायती भागात खरिपाचा हंगाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियान तसेच ओढा खोलीकरण या उपक्रमामुळे जिरायत भागातील भूजल पातळी देखील वाढले आहे. पाऊस देखील वेळेत झाला आहे, त्यामुळे यंदा पर्याप्त पाणीसाठा देखील उपलब्ध असणार आहे. जिरायत भागात मका, बाजरी, कडधान्य, सोयाबीन, भुईमूग, चारा पिके तसेच भाजीपाला लागवड होते.
जून महिन्यातील पावसाची सरासरी (मिमीमध्ये)
बारामती : 183.25
मालेगाव : 113.50
पणदरे : 157.75
वडगाव निंबाळकर : 165.00
लोणी भापकर : 193.25
सुपे : 268.75
मोरगाव : 210.25
उंडवडी : 147.75