-->
होळ ;  कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त

होळ ; कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त

होळ (ता. बारामती) ग्रामपंचायतीअंतर्गत मातंगवस्ती येथील रस्त्याचे काम विहीत मुदतीत पूर्ण केले नसल्याने ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिले आहेत. तसेच, सदर ठेकेदाराबद्दलचा अहवाल जिल्हा परिषद व पंचायत समितीस सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


                 दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होळ  (ता. बारामती)  ग्रामपंचायतीअंतर्गत कांबळेवस्ती, मातंगवस्ती एक व मातंगवस्ती दोन अशा तीन ठिकाणी काँक्रीट रस्ते मंजूऱ झाले होते. या रस्त्यांच्या कामाबाबतच्या तक्रारी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक वाघ यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. याबाबत बांधकाम उपअभियंता यांनी चौकशी करत अहवाल सादर केला होता. मात्र, वाघ यांनी अहवालावर समाधान न मानता संबंधितांवर कारवाईची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु गटविकास अधिकारी काळभोर यांनी सदर प्रकरणी वाघ यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली. यामध्ये कांबळेवस्ती व मातंगवस्ती दोन या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे फलक लावावेत असे आदेश केले. कांबळेवस्ती रस्त्याकडेला शेतकऱ्यांनी जागा दिली तर साईडपट्ट्या भरून घेण्याचे आश्वासन बांधकाम कनिष्ठ अभियंता यांनी दिले. दरम्यान, मातंगवस्ती एक या ठिकाणच्या कामाची निविदा किरणकुमार बाळासाहेब वायसे या ठेकेदारास ८ जानेवारी २०१९ रोजी मिळाली होती. परंतु जूनपर्यंतच्या मुदतीत त्यांनी काम पूर्ण केले नाही.

ग्रामपंचायतीने याप्रकरणी नोटीसा बजावल्या आणि अखेर काम काढून घेत फेरनिविदा काढण्याची वेळ आली, असे चौकशीत निष्पन्न झाले. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी सदर ठेकेदारची अनामत रक्कम जप्त करून चौकशी अहवाल मागविला आहे. ठेकेदारावर झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारांना इशारा मिळाला आहे. सुनावणीस बांधकाम अभियंता आर. ए. कोकणे, कनिष्ठ अभियंता ए. एन. झारगड, विस्तार अधिकारी डी. डी. खंडाळे, ग्रामसेवक डी. जी. बालगुडे उपस्थित होते. दरम्यान कांबळेवस्ती (आनंदनगर) येथिल अपुऱ्या कामास जबाबदार असणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी किंवा ठेकेदार त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक वाघ यांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article