“नीरा देवघर’ धरण यावर्षी 20 दिवस उशिराने भरले
निरा – भोर तालुक्यातील भाटघर धरण काहि दिवसांपूर्वीच 100 टक्के भरले असून त्यामधून 6500 क्यूसेक्स ने विसर्ग चालू आहे, आता त्याच्या पाठोपाठ आता नीरा देवघर धरण ही 100 टक्के भरले असल्याचे धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी सांगितले. धरणातून 2476 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20 दिवस उशिरा धरण भरले आहे.
नीरा देवघर धरण हे 11.88 टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे धारण असून मागील वर्षी धरण 3 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले होते. मात्र, या वर्षी धरण भागात उशिरा पाऊस सुरु झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास 20 दिवसांचा अधिक कालावधी लागला आहे.
धरणावरील वीज केंद्र दोन दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आले असून त्यासाठी धरणातून 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वीज निर्मिती केंद्रातून प्रतीदिन 6 मेगॅव्हॅट वीज निर्मिती होत असल्याचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी सांगितले.
नीरा देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण मंदावले असले तरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांचा शासन दरबारी लढा सुरूच
या धरण प्रकल्पात 19 गांवच्या शेत जमिनी पूर्णतः तर सात गावे अंशतः बुडित क्षेत्रात गेल्या असून 1554 हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अद्याप पुनर्वसन बाकी असून त्यांचा शासन दरबारी यासाठी लढा सुरुच आहे. या धरण प्रकल्पातील कालव्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने धरणाचे सारे पाणी नीरा नदीतून वीर धरणात संकलित केले जाते. या धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, तालुक्यांसह माळशिरस पर्यंतच्या शेतीसाठी पुरण्यात येणार आहे.