-->
आर.एन. शिंदे यांना खंडणी मागणारा अटकेत, 3 दिवसांची पोलीस कोठडी

आर.एन. शिंदे यांना खंडणी मागणारा अटकेत, 3 दिवसांची पोलीस कोठडी

 बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आर. एन. शिंदे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या मुसक्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीला काल थेट नाशिक येथे जाऊन जेरबंद केले. आज बारामती न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. असिफ मणियार (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.


शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते असून, पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते जिल्ह्यात कोट्यवधी रुपयाची सामाजिक कामे करत आहेत.


नेमक्या याच मदतीच्या आकड्यांवर डोळा ठेवून नाशिक येथील त्यांच्याच असिफ मणियार या जुन्या कामगाराने दोन कोटींची खंडणी मागितली होती. वेळोवेळी वेगवेगळ्या फोनवरून पैसे मागत त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती.


त्यामुळे शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीगणेश कवीतके, जमादार महेंद्र फणसे, गौतम लोहकरे आदींच्या पथकाने त्याला गाफील ठेवत काल नाशिक येथे ताब्यात घेतले. आज बारामती न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article