मोरगाव, प्रथमच गणेश चतुर्थीला मयुरेश्वर मंदिरात शुकशुकाट
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी पहील्यादांच शुकशुकाट जाणवला. दरवर्षी या दिवशी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भक्तगण मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मात्र कोरोणा या विषाणूजन्य आजारामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांचा शुकशुकाट पाहायला मिळत होता .मंदिर बंद असले तरी येथील विधिवत व परंपरेने चालत आलेले सर्व धार्मिक पुजा -पाठ कार्यक्रम संपन्न झाले.
मोरगाव ता . बारामती येथे काल दि २१ रोजी महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्तीची स्वारीचे आगमन सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान झाले . यानंतर मुख्य विश्वस्त मंदार देव मंगलमुर्तीची स्वारी घेऊन मयुरेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात गेले . सदर मंगलमुर्ती स्वारीचे स्वागत विश्वस्त विनोद पवार , राजेंद्र उमाप , विश्राम देव यांनी केले. यानंतर मंगलमूर्ती व मयुरेश्वराची भेट हा धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झाला . रात्रभर पदे , पूजा पाठ आदी कार्यक्रम संपन्न झाले.
दरवर्षी मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने भाद्रपद उत्सवात भाद्रपद शुद्ध प्रतीपदा ते पंचमी या काळात मुख्य मूर्ती गाभारा सर्व धर्मीयांसाठी खुला असतो . मात्र कोरोणामुळे मंदिर बंद असल्याने भावीकांना मुक्तदार दर्शन व श्रींस जलस्नान घालण्याच्या दुर्मिळ योगास मुकावे लागले आहे .
आज मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते श्रींची महापूजा ,पळीपुजा आदी कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी विश्वस्त विनोद पवार , विश्राम देव उपस्थित होते .पूजेनंतर मयुरेश्वरास नैवेद्य दाखवण्यात आला . रात्री उशीराप्रर्यंत पुढील कार्यक्रम संपन्न झाले.