विक्रम खलाटे व नारायण शिरगावकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक जाहिर
कोऱ्हाळे बु||- : बारामती तालुक्यातील लाटे येथील पोलिस अधीक्षक विक्रम मुकुंदराव खलाटे व बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट तपासाबद्दल पदक जाहिर केले आहे.
विक्रम खलाटे सध्या 'एनआयए'च्या पश्चिम विभागाचे प्रमुख आहेत. विमान अपहरण विषयक प्रकरणाचा गुणवत्तापूर्ण व वेगवान तपास करून आरोपीस आजीवन करावासापर्यंत पोचविण्याच्या कामगिरीबद्दल त्यांना हे पदक जाहिर झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे कर्तव्य बजावत असताना केलेल्या तपासाबद्दल नारायण शिरगावकर यांना हे पदक जाहिर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे त्यांना सलग दुसरे पदक प्राप्त झाले आहे.
जेट एअरवेजच्या मुंबई-दिल्ली या विमानाच्या शौचालयात 'विमानात अतिरेकी आहेत आणि बाँब ब्लास्ट होणार आहे' अशी इंग्लिश व उर्दू भाषेत चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. विमानाचे अपहरण करण्यासारखी प्रथमदर्शनी परिस्थिती होती. चिठ्ठी पायलटच्या निदर्शनास आल्यावर अहमदाबाद येथे विमान उतरविण्यात आले होते. बाँबशी संबंधित घटना असल्याने एनआयएकडे तो विषय आला होता. खलाटे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास अत्यंत गुणवत्तापूर्ण पध्दतीने केला होता. संबंधित आरोपीस आजीवन कारावास आणि तब्बल पाच कोटींचा दंड झाला होता. ते विमान पीओके (पाकव्याप्त काश्मीर)मध्ये घेऊन जायचं असंही या घटनेत प्रथमदर्शनी दिसत असल्याने तपासाकडे देशाचे लक्ष होते.
लाटे (ता. बारामती) येथील विक्रम खलाटे हे 2008-2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तेरा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी नागालँड येथे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असताना राज्यपालांचे सुवर्णपदक पटकावले होते.
बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर गंगाखेड येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावातील एका पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करुन मृतदेह विहीरीत टाकून देण्यात आला होता. त्याच काळात कोपर्डीची घटना घडली होती, त्या मुळे वातावरण संवेदनशील होते. या घटनेनंतर या परिसरातील जनतेचा आक्रोश होता. या संवेदनशील घटनेचा तपास शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
या गुन्हयाप्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोड त्यांनी गुन्हेगारास शोधून काढले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात जे दोषारोपपत्र सादर केले, तसेच जे पुरावे गोळा केले होते, त्या आधारे तीन वर्षात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.