टाटा ट्रस्ट बारामतीत, कोविड केअर हॉस्पिटल उभारणार!
बारामती : कोरोनाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट बारामतीकरांच्या पाठीशी उभा ठाकणार आहे. बारामतीत 100 खाटांचे कोविड केअर हॉस्पिटल टाटा ट्रस्ट उभारून देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.
बारामती एमआयडीसीतील शासकीय महिला रुग्णालयाशेजारी असलेल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत हे कोविड केअर हॉस्पिटल उभारले जाणार आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने बुलढाणा येथे 104 खाटांचे हॉस्पिटल उभे राहिले आहे, सांगली येथे 50 खाटांचे हॉस्पिटल प्रगतीपथावर आहे. बारामतीतही टाटा ट्रस्टने असेच हॉस्पिटल उभारुन द्यावे, या प्रस्तावित हॉस्पिटलमध्ये 75 बेडसना ऑक्सिजनची सुविधा तर 25 बेडला व्हेंटीलेटर्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सर्व 100 बेड वातानुकूलित अतिदक्षता विभागाअंतर्गत असतील. त्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या मध्ये रुग्णविभाग, तपासणी, जनरल केअर, प्रयोगशाळा, स्क्रिनिंग व प्रोसिजर रुम, यात प्रत्येक बेडला मेडीकेशन ड्रॉवर, ओव्हरबेड टेबल, आयव्ही स्टँड, सर्व बेड मेडीकल ऑक्सिजन पाईपलाईनने परस्परांशी जोडलेले असतील. मोबाईल एक्स रे तसेच अल्ट्रासोनोग्राफी मशीन, हिमॅटोलॉजी अँनेलायझर, सिरींज व इनफ्युजन पंप, व्हिडीओ लॅप्रोस्कोप, वॉर्ड नर्सिंग स्टेशन, ईसीजी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर लेव्हल मॉनिटर, इन्फ्रारेड थर्मोमीटर, स्टीम स्टरलायझर, अल्ट्रासॉनिक क्लिनर्स, रक्त साठवण सुविधा यासह अनेक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
बुलढाणा व सांगली येथील रुग्णालयात या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून बारामतीतही या सुविधा मिळाव्यात अशी विनंती प्रशासनाच्या वतीने टाटा ट्रस्टला करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाशेजारी असलेल्या नर्सिंग महाविद्यालयाची इमारत तयार असल्याने येथे तातडीने हे रुग्णालय उपलब्ध होऊ शकते, त्या मुळे तातडीने बारामतीत या कामास प्रारंभ व्हावा असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्फत पाठविला जाणार आहे. दरम्यान आज या संदर्भात कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली.