बारामतीच्या पश्चिम भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एका महिन्यात तब्बल 5 ठिकाणी झाल्या चोऱ्या तर एका ठिकाणचा डाव फसला
Saturday, October 31, 2020
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ५ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत तर काऱ्हाटी याठिकाणी चोरट्यांचा डाव फसला आहे.
यामध्ये या महिन्यातील पहिली घटना दिनांक 10 रोजी निरा-मोरगाव रोडवर चौधरवाडी गावच्या हद्दीत 3 व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरला थांबवून त्याच्याकडील रक्कम 35 हजार रुपये पळविले आहेत.
दुसरी घटना दिनांक 17 रोजी वडगांव निंबाळकर येथील सुधीर शहा यांचे भुसार मालाचे व त्यांच्या चुलते संतोष शहा यांचे किराणा मालाचे दुकान फोडून चोरट्यानी त्यामध्ये 1 लाख 58 हजारांची चोरी केली आहे.
तिसरी घटना दिनांक 17 रोजी निरा मोरगाव रोडवर ट्रक ड्रायव्हर शिवाजी ठोंबरे याने कांद्याची आलेली पट्टी चोरीला गेल्याचा बनाव केला होता पण ड्रायव्हरनेच ती पट्टी साउंड बॉक्समध्ये लपवली होती ती घटना वडगांव निंबाळकर पोलिसांनी उघडकीस आणली असून ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
चौथी घटना दिनांक 26 रोजी अमर ज्वेलर्स पळशी यांच्याकडील 11 लाख 66 हजार 200 रुपयांचा ऐवज गाडीवर आलेल्या 3 चोरट्यानी तोंडावर मिरची पूड टाकून लुटला आहे.
पाचवी घटना ही दिनांक 27 ते 28 चे दरम्यान चौधरवाडी येथील डांबर प्लांटमधून एकूण 2 लाख 97 हजार 500 रुपयांच्या वस्तूंची चोरी झाली आहे.
का-हाटी येथे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांचा ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे ग्रामस्थांनी पाठलाग केला असता अंधाराचा फायदा उठवत उसातून पळ काढला आहे. तर चोरट्यांनी दुचाकी जागीच टाकून देत उसातून पळ काढला. यावेळी त्यांची दुचाकी वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
बारामतीच्या पश्चिम भागात या महिन्यात 5 चोरीच्या घटना घडल्या असून एका चोरीचा बनाव उघडकीस आला आहे व काऱ्हाटी येथील चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा डाव फसला आहे.