बारामती, ४ रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जादा बिले आकारल्याने कारवाई, ३६ लाख रुपये परत करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
बारामती : बारामती शहरातील चार खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जादा बिले आकारल्याचे समोर आले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या बिलांच्या तपासणीत ही बाब उघड झाली. यामुळे सुमारे ३६ लाखांची रक्कम या रुग्णालयांनी परत करावी, असे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.
यासंबंधी रुग्णालयांना नोटीसा बजावणार, असल्याचेही प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.
शहरातील चार रुग्णालयांनी जादा बिले आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण १६ रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढणार असून जादा बिले आकारली गेली असल्यास रुग्णांना ती परत मिळणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे म्हणाले.
खासगी रुग्णालयाच्या बिलांची तपासणी प्रांताधिकाऱ्यांनी नेमलेल्या लेखापरीक्षकांनी केली. यामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम या रुग्णालयांनी आकारल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम रुग्णालयांनी रुग्णांना परत करावी, यासाठी नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यांनी ती परत न केल्यास दंड अथवा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी म्हणाले.
शासनाच्या आरोग्य विभागाने २१ मे व ३१ ऑगस्टला बिलासंबंधी अधिपत्रक काढले होते. शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारणी करावी, असेही या अधिपत्रकात नमूद करण्यात आले होते. तरीही खासगी रुग्णालयांकडून अवाच्या सव्वा बिल आकारणी झाली आहे. शहरातील जवळपास १६ रुग्णालयांतील बिले प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत. चार रुग्णालयांची छाननी पूर्ण झाली. त्यात जवळपास ३६ लाख रुपये अधिक घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
३ लाख ६० हजार रुपये करावे लागले परत
काही रुग्णालयांनी जादा बिले आकारल्याची तक्रार रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. शहरातील सात रुग्णालयांबाबत १० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यात आली. त्यात जादा बिले घेतल्याचे उघड झाल्याने रुग्णांना सुमारे ३ लाख ६० हजारांची रक्कम परत करण्याची वेळ रुग्णालयांवर आली.
शहरातील चार रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. एकूण १६ रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांची संख्या अजून वाढेल, अशी शक्यता आहे. शासन निर्देशानुसार बिले घेतलेली नसल्यास ती रुग्णांना परत करावी लागतील.
- दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी, बारामती