
मोबाईल शॉपीतील 9.26 लाखांचा मुद्देमाल चोरणारे 48 तासाच्या आत गजाआड; वडगांव निंबाळकर पोलिसांची कामगिरी
Monday, December 7, 2020
Edit
सुपे - बारामती तालुक्यातील सुपे बसस्थानकाजवळील नवजीवन मोबाईल शॉपी मध्ये चोरट्यांनी तब्बल 9 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता, मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्परता दाखवून 48 तासांच्या आत चोरटे जेरबंद केले.
सुपे येथील बसस्थानकाशेजारी नवजीवन नावाची मोबाईल शॉपी आहे. या शॉपीचे मालक मयूर बाबासाहेब लोणकर हे शुक्रवारी दुकान बंद करून घरी गेले होते, मात्र जेव्हा शनिवारी दुकानात आले, तेव्हा दुकानांमध्ये अस्ताव्यस्त पसरलेले सामान त्यांनी पाहिले. तसेच शटर उचकटलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माहिती घेतली असता दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, एलईडी टीव्ही, पेन ड्राईव्ह, चांदीचे शिक्के, मेमरी कार्ड व सहा लाख तीन हजार 70 रुपयांची रोख रक्कम असा 9 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी सुपे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेलार, सहाय्यक फौजदार डी एस जाधव, पोलीस शिपाई के.व्ही. ताडगे, विशाल नगरे यांची पथके त्यांनी तयार केली दरम्यान या दुकानात सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांचे स्केच बनवून त्यांनी तपासणीसाठी पाठवले.
यातील सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्याकडून माहिती घेतल्यानंतर अतुल पोपट येडे (या. लिंगाळी तालुका दौंड) याने हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांचा बळावला. त्यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मिथुन प्रकाश राठोड (वय 19 वर्षे ), संदीप बाबुराव राठोड (वय 24 वर्षे), आकाश मच्छिंद्र गुंजाळ (वय 22 वर्षे) अन एका अल्पवयीन मुलासह हा गुन्हा केल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.