-->
मी बाळूमामाचा वंशज नाही; मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले; बदनामी करणाऱ्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

मी बाळूमामाचा वंशज नाही; मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले; बदनामी करणाऱ्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेतून फसवणूक करत 40 लाख रुपये किमतीचा रो हाऊस घेतल्याचं या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या सर्व आरोपावर आता मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.यावेळी मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.

मी बाळूमामा यांचा वंशज नाही. मी त्यांचा भक्त आहे. गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी शेती आहे. तसंच माझ्याकडे गोकूळ दुधाची एजन्सी आहे. मालिकांसाठी मार्गदर्शन करतो, त्यातून माझ्याकडे इतकी संपत्ती आलीय. मी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांचं भविष्य सांगतो. कुठल्याही प्रकारची बुवाबाजी करत नाही, असा दावाही मनोहर मामा यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. या व्यतिरिक्त त्यांचे आणि माझे काही संबंध नाहीत. गावातील भावकी, तसंच पार्किंगच्या वादातून आपल्यावर हे आरोप केले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात 100 कोटीचा अब्रुनुकसानाचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article