-->
बारामती शहरासह तालुक्यात कोरोनासंसर्गाचा दर 5 टक्क्यांच्या पुढे वाढल्यास कडक निर्बंध - उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती शहरासह तालुक्यात कोरोनासंसर्गाचा दर 5 टक्क्यांच्या पुढे वाढल्यास कडक निर्बंध - उपमुख्यमंत्री अजित पवार


बारामती :-  बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत वेळेत पूर्ण  करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

         बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,  अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते,  अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ पुणे प्रकाश भोसले,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,  गटविकास अधिकारी राहूल काळभोर,  पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता                  श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे,  शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गट नेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

       बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता,  आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात कोरोनासंसर्गाचा दर 5 टक्क्यांच्या पुढे  वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील म्हणून सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये. टाक्स फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची  शक्यता वर्तवली आहे, त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरु आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहितधरुन ऑक्सिजनचा साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच  मॉल मध्ये प्रेवश देणे बंधनकारक करा.  लसीकरणांचे नियोजन व्यवस्थित करावे. पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या. बारामतीमध्ये एम.आ.डी.सी. मधील कंपन्यानी तसेच व्यापारी वर्गांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित कराव्यात अशा सूचना त्यंनी दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरतांना दिसत नाहीत तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

          या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, ख्रिश्चन कॉलनी येथील कॅनलवरील ब्रिजचे काम, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल,  ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत, बारामती कुस्ती केंद्र व  पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.


          या बैठकीपूर्वी सांगली  जिल्ह्यातील खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ आणि पांडुरंग प्रतिष्ठान गोकुळवाडी व नगरपारिषद सदस्य अनिता गायकवाड यांच्या सहकार्याने दीड लाखांचे जीवनावश्यक वस्तुंचे किट पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. या मदतीचे वाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. तसेच तुकाराम भापकर प्रतिष्ठाण, पुणे व सायंबाचीवाडी यांच्यावतीने एनव्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायत यांच्यावतीने लावण्यात आलेल्या झाडांना पाणी पुरविण्यासाठी 5 पाण्याचे टँकर तसेच यादगार सोशल फॉऊडेशन, बारामती यांच्यावतीने 5 आर.ओ. प्युरीफायर व 1000  लिटर वॉटर टँकच्या पाच टाक्या  दर्गा मशिद, सिध्देश्वर मंदिर, महिला ग्रामिण रुग्णालय, बारामती शहर पोलिस स्टेशन यांना व पुणे जिल्हा ॲम्ब्युलन्स असेसिएशन यांच्यावतीने 1 लाख रुपयांचा धनादेश कोविडसाठी मदत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article