
लाटेत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
Monday, August 16, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे येथे जिल्हा परिषदेच्या फंडातून सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या संरक्षण कठड्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सरपंच शितल अनुराग खलाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून इतर तालुक्यांपेक्षा बारामतीला जास्तीचा निधी देतात. सर्व कामे खासदार, आमदार, डीपीडिसी, जिल्हा परिषद फंडातून होतात. सर्व कामे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाची कामे व्हावीत अशी अजितदादांची रास्त अपेक्षा असते.
त्या अनुषंगाने लाटे येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीच्या संरक्षण कठड्याला सुमारे ९ लाख रुपये निधी मंजूर झाला असून सदरचे काम शिरष्णे येथील मोरया मजूर संस्थेने घेतले असून त्याचे काम सब ठेकेदार म्हणून खंडोबावाडीचे सबठेकेदार धनंजय गडदरे करत आहे. सुरुवातीपासूनच काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चांगले काम होण्यासाठी सरपंच शीतल खलाटे सूचना करत होते व वेळोवेळी गटविकास अधिकारी शाखा अभियंता झारगड यांना सूचना देऊनही सबठेकेदाराने मनमानी काम सुरू ठेवल्याने सरपंच शितल खलाटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून लेखी तक्रार केल्याने अजितदादांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबर राजेंद्र खलाटे उपस्थित होते.