
बारामतीत बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक; २ महिन्यांत ३ गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा समावेश
आजचा युवक, आजचा तरुण हा उद्याचा सुजाण नागरिक असतो म्हणूनच आजच्या युवा पिढीला सुशिक्षित असणे, सर्वच क्षेत्राची योग्य ती माहिती असणे गरजेचे असते, कारण या युवा पिढीच्या हातातच पुढे जाऊन देशाची आर्थिक सामाजिक प्रगती अवलंबून असते. म्हणूनच युवा पिढीला सक्षम करण्यासाठी अनेकदा सरकार प्रयत्नशील असते. आजची युवा पिढी सक्षम असणे अतिशय आवशक्य आहे. परंतु गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता हल्ली अल्पवयीन मुले तरुण होण्याच्या आधीच बालपणातच गुन्हेगारी कडे वळतात, त्याची अनेक कारणे आहेत, परंतु बालगुन्हेगारी चा चढता आलेख पाहता ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
४ दिवसांपूर्वी उंडवडी येथे शेतात खुरपण करणाऱ्या महिलेच्याच हातातील विळा घेऊन त्याच विळ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील ४.७५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पळवले. या गुन्ह्याचा वडगांव निंबाळकर पोलिसांनी वेगाने तपास करून ४ दिवसांत यामध्ये सामील असणाऱ्या आरोपीना बेड्या ठोकल्या. यात सौरभ तात्याबा सोनवलकर वय 20 वर्ष रा.सस्तेवाडी ता.बारामती, सागर दतात्रय जगताप वय 21 रा.वाणेवाडी ता.बारामती व सस्तेवाडी येथील एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या महिन्यात बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने बारामती शहर, बारामती तालुका,दौड अशा वेगवेगळया पोलीस ठाण्याचे हददीत मोटार सायकल चोरणाऱ्या विधीसंघर्षीत बालकास विश्वासात घेवुन त्याचेकडुन तपासादरम्यान २,३०,०००/ - रू किंमतीच्या एकुण ०७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
बारामती तालुक्यात २ महिन्यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावर राजकिय वैमनत्स्यातून हल्ला झाला. तालुका पोलिसांनी २४ तासाच्या आत यातील सूत्रधार प्रशांत मोरे याच्यासह राहूल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टॉम मोरे यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये देखील एका इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने गोळी चालवली.
तालुक्यात असो की संपूर्ण राज्यात लॉकडाऊन काळात छो्यामोठ्या चोऱ्या, घरफोड्या, खून, दरोडे तसेच प्राणघातक हल्ले अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक अशी वाढ दिसून येत असून यामध्ये बालगुन्हेगारीचे प्रमाणात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे.
बालगुन्हेगार वाढण्याची नेमकी काय कारणे असतील ?
गरिबीमुळे बाल गुन्हेगारी वाढते ही समजण्यासारखी गोष्ट आहे पण अलीकडे श्रीमंत घरातील मुलेही अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकत चालली आहे.
गरीबी, पैशाची चणचण, व्यसन पूर्ती साठी पैशाची गरज, आजूबाजूच्या लोकांचे श्रीमंती राहणीमान, मोबाईल, टॅब या सारख्या वस्तूंचे आकर्षण इत्यादी कारणां मुळे ही मुले गुन्हेगारी कडे आकर्षित होतात.अत्यंत हलाखीची गरिबीची परिस्थिती असणारी मुले ही रस्त्यावर, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, फ्लटफॉर्म वर राहत असतात. अश्या ठिकाणी गुन्हे मोठ्या प्रमाणावर होतात. अनेकदा ही मुले मोठ्या मुलांचे बघूनही गुन्हेगारी कडे वळतात.
केवळ गरीब घरातील मुलेच गुन्हे करतात असे नाही, अनेकदा उच्च मध्मवर्गीय तसेच धनाढ्य घरातील मुलेही गुन्हेगार म्हणून पकडली जातात. वाईट संगत, पालकांचे मुलांवर लक्ष नसणे, एक व दोन मुले असल्याने त्यांचे प्रमाणाबाहेर लाड होणे, त्यांनी मागितलेली कोणतीही वस्तू त्यांना लगेच आणून देणे, त्यामुळे मुले लाडवतात व त्यांना नकार ऐकण्याची सवय राहत नाही. अशा मुलांचे जरा बिनसले की किंवा त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्यांचा मानसिक तोल जातो. चित्रपट, टीव्ही वरील हिंसक दृश्ये व कामुक दृश्ये वा अश्लिल चित्रपट पाहण्याची सवय, इंटरनेट चा गैरवापर यामुळे उच्चभ्रु कुटुंबातील मुले गुन्हे करण्यासाठी प्रवुत्त होतात.
बाल गुन्हेगार यांच्या कडून घडणाऱ्या प्रत्येक गुन्हा ची नोंद असते असे नाही त्यामुळे अश्या प्रकाराच्या गुन्ह्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता जास्त आहे.
वयाचा परिणाम काय असेल?
बालगुन्हेगारीच्या व्याख्येमध्ये आता बदल करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगाराचे वय १८ वरून १६ वर आणले आहे. त्यामुळे या निर्णयाचे नेमके परिणाम आता दिसणार आहेत. मात्र, त्यातूनही नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. गुन्हेगार घडवणारी यंत्रणाच आपण बदलू शकलो नसताना १६ वर्षांच्या बालगुन्हेगाराला गंभीर घटनांमध्ये होणाऱ्या मोठ्या शिक्षेने वचक बसतो की नव्या गंभीर प्रश्नांना निमंत्रण देतो, हे परीक्षा घेणारेच असणार आहे. त्या परिणामांना सामोरे जाण्याची, प्रश्नासन आणि समाज म्हणून आपलीही तयारी आहे का, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालक, सरकार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. आणि योग्य तो तोडगा काढून ही समस्या मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे. अन्यथा देश समाज याची प्रगती अधोगतीला लागून समाज रसातळाला जायला वेळ लागणार नाही.
----- अमर राजेश वाघ
9049229448