
गेली दिड वर्ष बंद असलेली बारामती-दौंड-पुणे लोकल सुरू करण्याची मागणी
गेल्या मार्च 2020 मध्ये पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर त्या दिवसापासून आजतागायत बारामती दौंड पुणे ही रेल्वे सेवा ठप्प आहे.
ही रेल्वे सेवा असंख्य बारामतीकरांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. बारामतीहून दौंड व पुढे पुण्याला सकाळी जाण्यासाठी ही रेल्वे सोयीची ठरते. अनेक चाकरमाने या रेल्वेने पुण्याला जातात. बारामती पुणे रेल्वेचे तिकीट अवघे तीस रुपये असल्याने अनेक कष्टकरी रेल्वेचा पर्याय पुण्याला जाण्यासाठी निवडतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती, याची सर्वांनाच जाणीव होती. आता मात्र राज्यात जवळपास सर्वच बाबी अनलॉक झालेल्या आहेत. एसटी सेवाही पूर्ण क्षमतेने करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून तशी सेवा दैनंदिन सुरु आहे. त्या मुळे आता बारामती दौंड पुणे रेल्वेसेवेलाही परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. रेल्वेचेही ही सेवा बंद असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होते आहे. दररोज रेल्वेने सरासरी 1800 प्रवासी प्रवास करतात व रेल्वेला महिन्याचे प्रवासी वाहतूकीतून सरासरी 45 लाखांचे उत्पन्न प्राप्त होते. दीड वर्षांपासून वाहतूकच बंद असल्याने रेल्वेचेही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.