
ट्रॅक्टरचालकाने लवकर साईड दिली नाही या रागातून १५ तरूणांनी चालकाच्या कुटुंबावर तलवारीने हल्ला करत एकावर केला गोळीबार
केवळ ट्रॅक्टरचालकाने लवकर साईड दिली नाही या रागातून पुरंदर व भोर तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वीस ते बावीस वयोगटातील पंधरा तरूणांनी चालकाच्या कुटुंबावर पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील घरी जाऊन तलवार, कोयता, हॉकी स्टीक अशा शस्त्रांनी हल्ला केला. तसेच अटकाव करणाऱ्या एकावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हत्यारे नाचवत गावात नंगा नाच करून दहशत माजविली. याप्रकरणी जेजुरी पोलिसांत पंधरा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासवड, भोर, राजगड पोलिस ठाण्यासह कोम्बिंग ऑपरेशन करून अभिजित विजय भिलारे (रा. भिलारवाडी ता. भोर), वैभव बबन थिटे (रा. हातवे ता.भोर), फारूख हमीद शेख (रा. भांबवडे ता. भोर), हितेश सुरेश मानकर (रा. कापूरहोळ ता. भोर), गमेश दशरथ गाडे (रा. कापूरहोळ ता. भोर), ऋत्विक दिनेश दामोदरे (कसबा बारामती), श्रेयश संपत थिटे (रा. वीर ता. पुरंदर) यांच्यासह एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशा आठ जणांना बारा तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. तर आदित्य भगवान कळमकर (रा. बेलसर ता. पुरंदर) व आदित्य तानाजी चौधरी (रा. नारायणपूर ता. पुरंदर) या दोन सूत्रधारांसह तसेच सागर वायकर (रा.पिसर्वे ता. पुरंदर), बंडा उर्फ अनिकेत संपत शिंदे (रा. खडकी ता. भोर), हर्षद भोसले (रा. कोडीत ता. पुरंदर), गोट्या उर्भ अक्षय संभाजी खेनट (रा. पिंपळे ता. पुरंदर), हरी बाळू कुदळे (रा. पारगाव ता. पुरंदर) हे सात आरोपी अद्याप फरार असून त्यांच्यावरही छापेमारी सुरू आहे.
सचिन मोहन मेमाणे (रा. पारगाव मेमाणे वय २५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टरने साईड न दिल्याच्या रागातून फिर्य़ादीच्या वडिलांशी आरोपी आदित्य कळमकर व आदित्य चौधरी यांची बाचाबाची झाली. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांनी आणखी तेरा साथीदार घेऊन सायंकाळच्या वेळी फिर्यादीच्या राहत्या घरावर दगडाने हल्ला केला. तसेच घरात घुसून धारदार लोखंडी हत्यारे, हॉकी स्टीकने फिर्यादी, वडील मोहन, आई मंगल, भाऊ निलेश, मामा संतोष यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
काहींनी अटकाव केला असता गणेश मेमाणे याच्यावर एकाने गोळीबार केला. सुदैवाने गणेश बचावला. यानंतर गावात दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाघापूर चौकामध्ये हत्यारे काढून नंगा नाच करत दुकाने बंद करायला लावली. अधिक तपास फौजदार नंदकुमार सोनवलकर करत आहेत.
जेजुरी पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिल्यावर आरोपी दोन तालुक्यातील विविध गावांचे असल्याचे लक्षात आले. मग रातोरात वरीष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक, फौजदार नंदकुमार सोनवलकर, संदीप कारंडे, महादेव कुतवळ, विठ्ठल कदम, सोमनाथ चितारे, धर्मराज खाडे आदींच्या पथकाने सासवड, राजगड व भोर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन करून आठजणांना अलगद सापळ्यात पकडले.