
पुणे जिल्ह्यातील ४२ गावांत प्रसंगी कडक लॉकडाऊन: बारामती, दौंड, इंदापूर, जुन्नर सह इतर ६ तालुक्यातील गावांचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील भोर, वेल्हे आणि पुरंदर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य दहा तालुक्यांमधील मिळून ४२ गावांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही गावे हाय रिस्क (उच्च धोका) गावे म्हणून जाहीर केली आहेत. या गावांमधील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजनांबरोबरच सर्वेक्षण, कोरोना चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार आहे. प्रसंगी या गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील सरपंच आणि ग्रामसेवकांना दिल्या आहेत.
कोरोनाचा उच्च धोका असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक १० गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. उर्वरित ३२ गावांपैकी दौंड आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी सहा, इंदापूर तालुक्यातील पाच, मावळ-४, आंबेगाव व खेड प्रत्येकी-३, मुळशी व बारामती प्रत्येकी-०२ आणि हवेली तालुक्यातील केवळ एका गावाचा समावेश आहे.
या ४२ गावांमध्ये मोरगाव (ता. बारामती), देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव, लिंगाळी, वरवंड (सर्व ता. दौंड), बावडा, शेटफळगढे (दोन्ही ता. इंदापूर), धोलवड, डिंगोरे, पिंपरी पेंढार (ता. जुन्नर), बिरदवडी, खरपूड, कोयाळी (ता. खेड), साळुंब्रे (ता. मावळ), मारुंजी, सुस (ता. मुळशी), कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदणे (ता. शिरूर) आदी प्रमुख गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ३१ गावे कोरोनापासून दूर
जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या गावांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाला वेशीवरच रोखून धरण्यात यश मिळविले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक पंधरा, वेल्हे तालुक्यातील आठ, भोर व मुळशी तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि आंबेगाव व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.