-->
समाजसेवा व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांकडून कोरोना व पूरग्रस्तांना मदतीसाठी सव्वा २ लाख रुपये निधी जमा

समाजसेवा व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांकडून कोरोना व पूरग्रस्तांना मदतीसाठी सव्वा २ लाख रुपये निधी जमा

व्हाटसअप, फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम ही सोशल मिडियातील आयुधे चांगल्या कामासाठी वापरली तर वेळापेक्षा समाजहित अधिक साधले जाऊ शकते. त्यामुळे सोशल मिडीयाने पोरं बिघडली असा आरोप करण्यापेक्षा त्यातून काय साधले याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, याचाच धडा बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर- निरा भागातील समाजसेवा या व्हाटसअप ग्रुपने दिला आहे. या ग्रुपमधील सदस्यांनी चक्क अडीच लाखांची वर्गणी करीत पूरग्रस्तांना मदत केली.

अलीकडे वेगवेगळ्या ग्रुपवर पोलिसांना कारवाई करावी लागत असताना दुसरीकडे असे ग्रुप विधायक मार्गाने समाजाचे मन जिंकत आहेत. सोमेश्वरनगर- निरा भागातील विधायक दृष्टीकोन समोर ठेवलेल्या समाजहित दक्ष वृत्तीच्या मित्रांनी एकत्र येऊन समाजसेवा हा ग्रुप सुरू केला. तो ग्रुप गेली आठ वर्षे कार्यरत आहे. वेळोवेळी समाजातील वेगवेगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून मदतीचे कामही करीत आहे.

 
आता राज्यात कोकणात व कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा आलेल्या पूरात या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल सव्वा दोन लाखांची मदत करण्यात आली. एक हाक दिली आणि चक्क २ लाख २८ हजार ७७१ रुपयांची लोकवर्गणी ऑनलाईन प्रतिसादातून जमा झाली.


 
या ग्रुपमधील २५६ सदस्यांनी एकत्र येऊन कोविड काळात पुरंदर, बारामती, खंडाळा व फलटण तालुक्यातील १९ कोविड सेंटरला १ लाख ११ हजार रुपयांची मदत केली होती.

आता पुन्हा कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची स्थिती पाहून ग्रुपमधील सदस्यांनी १ लाख १७ हजार ७७१ रुपया्ंचा निधी जमा केला. यातून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील खडकेवाडा व गलगले भागात २८ कुटुंबांना २५ हजार रुपयांचे किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यासाठी पत्रकार संतोष शेंडकर, योगेश यादव-सोळसकर, डॉ. राहूल खऱात, मदन काकडे, राजकुमार बनसोडे आदींनी या वाटपाचे नियोजन केले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील जुने खेड गावात अंदाजे २५ हजार रुपये किंमतीचे साहित्य वितरीत करण्यात आले. यामध्ये प्रसाद सोनवणे, धैर्यशील काकडे, योगिराज काकडे यांनी नियोजन केले.

पाटण तालुक्यातील मरळी ग्रामपंचायतीच्या वतीने आंबेघर ग्रामपंचायतीसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे राहूल काकडे, प्रियराज काकडे, अमरदिप काकडे, डॉ. सौरभ काकडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

अजूनही कोकण भागात पूरग्रस्तांना मदतीसाठी काम सुरू असून याकरीता संतोष सोरटे, अंकुश जगताप, पी.एल. निगडे, परवेज मुलाणी नियोजन करीत आहेत. या ग्रुपला समाजहितासाठी सदैव दक्ष राहण्यासाठी पत्रकार दत्ता माळशिकारे, अजय कदम, राहूल काकडे, अभिजीत काकडे, अॅड. गणेश आळंदीकर, दिलीप खैरे, गौतम काकडे, राजेंद्र गलांडे, टी.के. जगताप, महेश जगताप, हेमंत घाडगे, कुमार जगताप, राहूल शिंदे, विनोद गोलांडे, हेमंत गडकरी, राजेंद्र निंबाळकर यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळते असे ग्रुपच्या सूत्रांनी सांगितले.

नुकतीच अॅड. गणेश आळंदीकर यांची ग्रुपच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ग्रुपच्या वतीने ग्रुपचे प्रमुख मदन काकडे, समन्वयक योगेश यादव-सोळसकर, खजिनदार राहूल खरात व समिती सदस्य प्रमोद पानसरे यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article