
लष्कर भरती पेपर फुटी प्रकरण : न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला
पुणे : पुणे पोलीसांनी उघडकीस आणलेल्या लष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी जामीन फेटाळला आहे. विशेष सरकारी वकिल अॅड. प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयात सांगितले की, उमेदवारांकडून परीक्षा पास झाल्यानंतर प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये घेणार होते. पैशांची शाश्वती राहावी म्हणून आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेतली होती.
महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय ३७, रा. दिघी. मुळ रा. अहमदनगर), अलीअख्तर अब्दुलअली खान (वय ४७) आणि आजाद लालमहमंद खान (वय ३७, रा. बोपखेल. मुळ रा. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहे.
आरोपींसह त्यांच्या एका साथीदाराला सैन्य भरती परिक्षेची कार्यपद्धती माहिती होती. त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रात रिक्रुटमेंट अकादमी चालविली जात होती. परिक्षेच्या एक दिवस आधी पेपर देतो असे सांगत उमेदवारांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणात मेजर किशोर गिरी (वय ४०, रा. बारामती), भारत अडकमोळ (वय ३७, रा. जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू) व वसंत किलारी (वय ४५) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना तांत्रिकदृष्ट्या जामीन मिळाला आहे. मात्र वानवडीच्या गुन्ह्यात त्यांचा जामीन नामंजूर असून, सध्या ते येरवडा कारागृहात आहेत.
जप्त व परीक्षेचा पेपर मिळताजुळता
जप्त केलेला पेपर व परीक्षेचा पेपर एकमेकांशी जुळत असल्याचा अभिप्राय लष्कराकडून मिळाला आहे. आरोपींनी अन्य आरोपींशी संगनमत करून कट कारस्थान रचले. तसेच, लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांशी हातमिळवणी केली व भरती परिक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी फोडून तो पेपर एकमेकांना आणि उमेदवारांना पाठविला, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी न्यायालयात केला.