
बारामती: कोरोनाचा वाढता आकडा पाहून आरोग्य विभाग टेन्शनमध्ये: या गोष्टींवर येऊ शकतात निर्बंध
गेल्या काही दिवसात बारामतीची पॉझिटीव्हीटीचा दर पाच टक्क्यांच्या आत असला तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची भीती कमी झाल्यामुळे प्रवास करणा-यांची संख्याही वाढू लागल्याने संसर्ग वाढू लागल्याचे दिसत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
लग्नसमारंभ व त्या नंतर होणा-या जेवणावळी कोरोनासंसर्गाचे प्रमुख कारण असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. जेवण करताना मास्क काढला जातो, परस्परांच्या संपर्कात लोक जवळून येतात, त्या मुळे जेवणावळींवर बंदी यायला हवी, अशी सूचना आता होते आहे.
प्रवास टाळायला हवा अशीही आरोग्य विभागाची सूचना असून अगदीच आवश्यक असेल तरच प्रवास करा, प्रवास करतानाही पुरेशी काळजी घ्यायला हवी कारण अनेकांचा संसर्ग हा बाहेरगावाहून प्रवास करुन आल्यानंतर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झालेले आहे. ग्रामीण भागात रॅपिड अँटीजेन तपासण्यांची संख्या लक्षणीय आहे, नगरपालिकेस मुख्याधिकारीच नसल्याने शहरातील तपासण्यांची संख्या मात्र नगण्य आहे. शहरातही तपासण्या वाढविणे नितांत गरजेचे असून ग्रामीणच्या तुलनेत शहरात तपासण्यांबाबत उदासिनताच आहे.
नागरिकांनी त्रिसूत्री पाळावी....
नागरिकांनी स्वताःहूनच मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनेटायझरचा सततचा वापर ही त्रिसूत्री पाळली तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल. खूपच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, लग्नसमारंभांसह इतर गर्दीच्या समारंभांना जाण्याचे टाळले पाहिजे
-डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.