-->
बारामतीत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन; राज्य शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप; एक लाख मोबाईल परत करणार

बारामतीत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन; राज्य शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप; एक लाख मोबाईल परत करणार

बारामती : राज्यातील अंगणवाडी सेविका राज्य शासनाला त्यांचे एक लाख मोबाईल परत करणार आहेत. निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिल्याचा आरोप करत हे मोबाईल परत केले जाणार आहेत.

    दरम्यान, आज बारामतीत 417 अंगणवाडी सेविका पंचायत समितीत आपले मोबाईल जमा करण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. पंचायत समिती प्रशासनास हे मोबाईल जमा करुन घेण्याबाबत सूचना नसल्याने ते मोबाईल जमा करुन घेण्यास तयार नाहीत.

येथे आंदोलनासाठी अंगणवाडी सेविका समितीच्या जिल्हाध्यक्षा आशाबी शेख तसेच रुक्मिणी लोणकर, माधुरी जगदाळे, सुरेखा क्षीरसागर, मंगल कोकरे, मीरा जाधव, शाईन सय्यद, शीला कुतवळ, जयश्री चांदगुडे, कविता तावरे, शारदा वाबऴे, सुमन हरिहर, सुमन आटोळे, जुलेखा काझी, पुष्पा खराडे, यशोदा इंगळे, सुलन जाधव यांच्यासह सेविका उपस्थित आहेत.

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत सन 2019 मध्ये राज्यातील 1 लाख 5 हजार 595 अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलची दोन वर्षांची वॉरंटी संपलेली आहे. दोन जीबी रॅमचा हा मोबाईल निकृष्ट दर्जाचा असल्याचा प्रारंभापासूनच आरोप होत होता. या मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इत्यादी सविस्तर माहिती भरण्यात येते.

या मोबाईलची क्षमताच कमी असल्याने त्यात भरायची माहिती अधिक असल्याने मोबाईल हँग होतात, गरम होतात त्या मुळे त्या मोबाईलवर काम करणे अवघड आहे. मोबाईल खराब झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजारांचा खर्च होतो, तो अंगणवाडी सेविकांनाच भरावा लागतो. राज्यात हजारो मोबाईल बिघडलेले असून तीन हजारांहून अधिकचे मोबाईल बंद पडले आहेत.

केंद्राने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँप दिलेले आहे. या मोबाईलची क्षमता कमी असल्याने हे अँप डाऊनलोडच होत नाही. इंग्रजीतील अँप असल्याने अनेक सेविकांना यात त्रयस्थांची मदत घ्यावी लागते आहे. या शिवाय डिलीटचा पर्याय नसणे, वर्गवारी, लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवाबाबत मार्गदर्शन न देणे, माहिती भरण्याची पध्दत किचकट असल्याच्या अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी आहेत.

काय आहेत मागण्या?

  • अंगणवाडी सेविकांना चांगल्या प्रतीचे व उच्च क्षमतेचे मोबाईल द्यावेत

  • मराठी भाषेत निर्दोष पोषण ट्रॅकर अँप मिळावे

  • या अँपमधील विविध त्रुटी तातडीने दूर कराव्यात.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article