
बारामती: बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरण: न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
Thursday, August 5, 2021
Edit
बारामतीतील काटेवाडी व इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील टोळीने पॅरासिटीमॉलचे पाणी रेमिडीसीव्हरच्या मोकळ्या इंजेक्शनमध्ये भरून विकले होते. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यावरून पोलिसांनी या टोळीला अटक केली होती. या घटनेला १०० दिवस झाले आहेत. आरोपींनी जामीनासाठी केलेला अर्ज आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.
रेमिडीसीव्हीरच्या इंजेक्शनसाठी संपूर्ण राज्यभरात रुग्णांचे नातेवाईक अगदी हातापाया पडत होते, त्या काळात या संकटाचा गैरफायदा घेऊन गोरखधंदा करणाऱ्यांची टोळी दवाखान्यांमध्ये सक्रीय झाली होती. यामध्ये बाारमती तालुका पोलिसांनी सापळा रचून यामधील चौघांना पहिल्यांदा अटक केली होती. यामध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील प्रशांत सिध्देश्वर घरत, काटेवाडी येथील शंकर दादा भिसे, काटेवाडी येथीलच दिलीप ज्ञानदेव गायकवाड व भिगवण येथील संदिप संजय गायकवाड या चौघांना पोलिसांनी अटक केली होती.
हे चौघे रेमिडीसीव्हीरच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉलचे पाणी भरून ते रेमिडिसीव्हीर म्हणून ३६ हजार रुपयांना विकत होते. यात एका रुग्णाचा मृत्यूही झाला. त्यामुळे नंतर या टोळीवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहायक निरीक्षक महेश विधाते यांनी अत्यंत तत्परतेने केलेल्या या कारवाईचे बारामतीसह आसपासच्या तालुक्यातही कौतुक झाले होते. यातील प्रशांत घरत, दिलीप गायकवाड, शंकर दादा भिसे या तिघांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायाधिश एस.टी,. भालेराव यांच्यासमोर याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी सरकारची बाजू मांडताना या गुन्ह्यात एका निरपराध रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने यातील आरोपींना जामीन देऊ नये असा युक्तीवाद केला. बचाव पक्षाचाही युक्तीवाद न्यायाधिशांनी ऐकला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.