-->
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी  सुरू: हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू: हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

बारामती : संपूर्ण राज्यामध्ये नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाले आहे.
         उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या या बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्ष लक्ष घालणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली असून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
        पुणे जिल्हा बँकेवर सुरुवातीपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. या बँकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, तसेच काँग्रेसचे नेते व विद्यमान आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र याला अपवाद इंदापूर आहे.मागील निवडणुकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादीमधून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून जगदाळे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपशी घरोबा करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे. आता या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे राष्ट्रवादीबरोबर येतात की, माजी सहकारमंत्री ‌ हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर राहून राष्ट्रवादीला आव्हान देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

        कराड (जि.सातारा) तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमध्ये शिरकाव केला आहे. या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून लक्ष घालण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. सहकार खाते अमित शहा यांच्याकडे असल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी सह राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या माध्यमातून सहकारी बँकच्या निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

         पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता काबीज करणे सध्यातरी भाजपला शक्यच नसल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीपासून या जिल्हा बँकेवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही मोठी सर्वात जमेची बाजू आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबरच शिवसेनेच्या काही नेत्यांना आघाडीच्या धर्मानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर घेणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्यातून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार मोर्चे बांधणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी केली आहे.

            इंदापूरचे विद्यमान आमदार व बँकेचे विद्यमान संचालक, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भूमीकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. जगदाळे यांना राष्ट्रवादीत पुन्हा परतण्यासाठी ना.भरणे प्रयत्न करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीत सप्टेंबर नंतर पुणे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, दरम्यानच्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article