
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा - दादासाहेब कांबळे
Thursday, September 16, 2021
Edit
बारामती : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नव मतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
तहसिल कार्यालय बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. कांबळे यांनी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येईल. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र प्राप्त करुन घेणे, मतदार याद्यांच्या पुनरिक्षणासंदर्भात प्रणाली व आज्ञावली यांचा वापर करणे व प्रशिक्षण देणे इत्यादी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असेही श्री. कांबळे म्हणाले.
कोव्हिड -19 च्या प्रार्दुभावामुळे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मतदारांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावर व वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये सुविधा उपलब्ध आहे. सदर सुविधांचा जास्तीत जास्त प्रचार केल्यास ऑनलाईन दावे व हरकती प्राप्त होतील. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अधिकाअधिक गतीमान होण्यासाठी व मतदार नाव नोंदणी प्रकिया सोपी करण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप (VHA) मोबाईल ॲप विकसित केले आहे त्या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार पाटील यांनी वोटर हेल्पलाईन ॲप कसे डाऊनलोड करावे आणि ॲपमध्ये असणा-या सुविधा याविषयी माहिती दिली. तसेच गावोगावी सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या सहाय्याने ॲप डाऊनलोड करण्याविषयी माहिती देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000