
तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे जिल्ह्यात सर्वांत उंच असलेल्या अतिदुर्गम तोरणा गडावर (ता. वेल्हे) महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले व स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेला तोरणा गड प्रकाशमान झाला.
वेल्हे, भोर व मुळशी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीमधून ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले.
तोरणा गडाच्या पायथ्याशी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य वीण शिंदे, वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य संगिता जेधे, वेल्हेचे सरपंच संदीप नगिने यांची उपस्थिती होती तर महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेल्हे तालुक्यामध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल १४०३ मीटर उंचीवर असलेला तोरणा गड सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्वाचा गड आहे. अतिदुर्गम व प्रचंड विस्तार असलेल्या तोरणा गडाचे विद्युतीकरण करण्यासाठी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. महावितरणकडून तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरवात करण्यात आली. यामध्ये उच्चदाबाच्या ११ केव्ही वाहिनीसाठी २७ वीजखांब तसेच लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले.
यासोबतच १८०० मीटर लांबीची भूमिगत वीजवाहिनी दऱ्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तसेच १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. घाटमार्गाने, डोंगरदऱ्यातून ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी कर्मचाऱ्यांना खांद्यावर वीजखांब व इतर साहित्याची वाहतूक करावी लागली. या विद्युतीकरणामुळे तोरणा गडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांची सोय झाली असून पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.
तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अतिदुर्गम परिसर व दऱ्याडोंगरात वीजयंत्रणा उभारण्यासाठी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे, कंत्राटदार अग्रवाल इलेक्ट्रीकल्स आदींसह अभियंता व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले