
बारामती: राज्य महीला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी घेतले मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन
Friday, November 5, 2021
Edit
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथे दिपावली पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरातील भावीकांनी मयुरेश्वर दर्शनासाठी गर्दी केली होती. आज पाडव्याच्या निमित्ताने राज्य महीला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली उपस्थित भावीकांना त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
आज दिपावली पाडव्याच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मंदीराचा मुख्य दरवाजा भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. आज सकाळी सात वाजता सालकरी ढेरे तर दुपारी चिंचवड देवस्थानच्यावतीने मयुरेश्वराची पुजा करण्यात आली. आज दिवसभरात पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, ठाणे, अहमदनगर, बीड आदी भागातून भक्त दर्शनासाठी आले होते. पाडव्याचे औचित्य साधून हजारो भक्तांनी आज श्रींचे दर्शन घेतले. दिपावली सुट्ट्यांमुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पेठेतील दुकाने हार, दुर्वा फुले, श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती.
मोरगावचे वाहन तळ, हॉटेल, फुल - पेढे दुकाने आदी भावीकांनी फुल्ल भरली होती. गेल्यावर्षी दिपावली काळात राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळांबरोबर मोरगाव मंदिर बंद होते. यामुळे स्थानिक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आज दुपारी राज्य महीला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले व आरती केली. यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने विश्वस्त विनोद पवार यांनी त्यांचे शाल व श्रींची प्रतीमा देऊन सत्कार केला. तर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच निलेश केदारी यांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच पोपट तावरे, बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अक्षय तावरे, गणेश कुंभार आदी उपस्थित होते.