-->
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज दाखल

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज दाखल

बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी गुरुवारी (ता. २ डिसेंबर) बारामती तालुका प्रतिनिधी अ वर्ग मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, अजितदादांच्या राजकारणाची सुरुवातच जिल्हा सहकारी बॅंकेवरील निवडीपासून झाली आहे, त्यामुळे त्यांचे बॅंकेशी विशेष नाते आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत (ता. २ डिसेंबर) पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, दत्तात्रेय येळे, सतीश खोमणे यांनीही अर्ज भरले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुण्यातील निवडणूक कार्यालयात अजित पवार यांच्या वतीने आज (ता. २ डिसेंबर) दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, तर अनुमोदक म्हणून दीपक मलगुंडे यांनी सह्या केल्या आहेत. दुसऱ्या अर्जावर अमोल गावडे यांचे सूचक म्हणून, तर लालासाहेब नलवडे यांचे अनुमोदक म्हणून नाव आहे. अर्ज दाखल करताना बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या बारामती तालुका प्रतिनिधी 'अ' वर्ग मतदारसंघात एकूण 195 मतदारांचा समावेश आहे. त्यातील बहुतांशी मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे आता पवारांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 1991 पासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सात वेळा पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.

अजित पवार यांच्या राजकारणाचा प्रारंभ हा पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदापासूनच झालेला आहे. त्यामुळे या बँकेशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या काही वर्षांपासून अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून संचालक मंडळही त्यांच्याच संमतीने ठरणार हे उघड आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या दुसऱ्या जागेवर अजित पवार हे विद्यमान संचालक मदनराव देवकाते यांना संधी देतात की नव्या चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते, याकडे बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या अजित पवारांशी जुळवून घेतलेले कट्टर विरोधक सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतही काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलबरोबर आघाडी करत आपल्या मुलाला संचालक बनवले आहे. त्यामुळे पवारांशी जुळलेले सूर सतीश काकडे यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उपयोगी ठरणार का, याची उत्सुकता तालुक्यात आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article