
ना स्वतःला कर्ज मुळेल, ना नातेवाईकाला इच्छुक बारामती बँक संचालकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सज्जड दम
दि बारामती सहकार बँकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. 15 जागांसाठी जवळपास राष्ट्रवादीच्या पॅनेल कडून 85 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. बारामती बँकेच्या राज्यभरात 36 शाखा आहेत. राष्ट्रवादीकडून प्रगती सहकार पॅनेल उभे करण्यात आलं आहे. जर संचालक म्हणून निवडून आलात तर स्वतःसाठी आणि नातेवाईकांना बँकेतून कर्ज घेऊन देता येणार नाही. जर तसं असेल तरच बँकेच्या संचालक पदासाठी उभे राहा असे आवाहन अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे.
राज्यातील अनेक जिल्हा बँकामधील निवडून आलेले संचालक आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करुन आपल्या गोतावळ्यामध्येच कर्जाचं वाटप करत असल्याचं दिसून येतंय. कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या नावाने कर्ज काढायचं, जवळच्या लोकांना भरमसाठी कर्जाचं वाटप करायचं अशा प्रकारामुळे राज्यातील अनेक जिल्हा बँका तोट्यात आल्या आहेत. तसेच नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा परतावा होत नसल्याने ते कर्ज एनपीएमध्ये जात असल्याचंही समोर येतंय. त्यावर वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून या बँकांची कर्ज माफ केली जातात. याचा फायदा हा संचालकांना आणि राजकारणाला होत असला तरी यामध्ये ठेवी असलेल्या सर्वसामान्य ठेवीदारांचे मात्र नुकसान होत आहे.