
बारामतीकरांसाठी खुशखबर: पुणे ते दौंड डेमु रेल्वे धावणार बारामतीपर्यंत; येत्या २७ तारखेपासून होणार सुरुवात
Tuesday, January 25, 2022
Edit
पुणे ते दौंड डेमु रेल्वेची सेवा दिनांक २७ जानेवारी २०२२ पासून बारामती पर्यंत वाढवण्यात येत आहे. ही रेल्वे सेवा पुणे-दौंड-मळद गाव-शिरसाई (शिर्सुफळ)-कटफळ-बारामती या मार्गावर सुरू होत असून अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. पुणे-बारामती डेमु रेल्वे सेवेबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव व भारतीय रेल्वे प्रशासनाचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली.
गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे.
बारामतीहून थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीतच आहे. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट काढताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे, १८ वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे.